
प्रक्रियेदरम्यान कोरोना नियमावलीचे पालन बंधनकारक केले असून, केंद्रांवर सॕनिटायझरच्या व्यवस्थेसह प्रत्येक मतदाराचे तापमान मोजले जाणार आहे. संशयित मतदाराला शेवटी मतदान करण्याची संधी मिळणार आहे.
शहादा (नंदुरबार) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय तयारीही पूर्णत्वास आली आहे. २१ ग्रामपंचायतींसाठी ४४९ उमेदवार रिंगणात असून, ७७ मतदान केंद्रांवर शुक्रवारी (ता. १५) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोना नियमावलीचे पालन बंधनकारक केले असून, केंद्रांवर सॕनिटायझरच्या व्यवस्थेसह प्रत्येक मतदाराचे तापमान मोजले जाणार आहे. संशयित मतदाराला शेवटी मतदान करण्याची संधी मिळणार आहे.
४१ हजार ५७० मतदार असून, त्यात २१ हजार २०१ महिला, तर २० हजार ३६९ पुरुष मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत मतदान केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी मतदाराचे तापमान मोजणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट अशा सूचना प्राप्त नसल्या तरी दक्षतेच्या दृष्टीने विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेप्रमाणे कोरोना नियमावलीचे पालन होणार आहे. मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मतदारांना मास्क बंधनकारक केला आहे.
ओळख पटविण्यासाठी मास्क काढावा लागणार
दक्षतेच्या दृष्टीने मतदारांसाठी केंद्रावर सॅनिटायझर व तापमान मोजण्यासाठी थर्मल गन उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक पुराव्यासह मतदारांना ओळख पटविण्यासाठी काही क्षण मास्क काढावा लागणार असून, ओळख पटल्यानंतरच मतदान करू दिले जाईल, अशी माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुळकर्णी यांनी दिली.
संपादन ः राजेश सोनवणे