esakal | शेळ्या हुसकावण्यासाठी गेला शेतात अन्‌ त्‍याच्या नजरेस पडले

बोलून बातमी शोधा

satpuda

शेळ्या हुसकावण्यासाठी गेला शेतात अन्‌ त्‍याच्या नजरेस पडले

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : सातपुडा म्‍हणजे ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार मानला जातो. याच परिसरातील काही गावांमध्ये देखील ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला असून शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्‍या युवकास अचानक नजरेस पडलेल्‍या बंदुकीच्या गोळ्यांनी इतिहासाला उजाळा मिळाला.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांचा ऐतिहासिक सहभाग असल्याचा खुणांनी प्रसिद्ध असलेल्या सातपुड्यातील रावलापाणी येथे पुन्हा नव्याने बंदुकीच्या गोळ्यांचे तब्बल ४ निशाण सापडले. शेतात घुसलेल्या शेळ्यांना हुसकवण्यासाठी गेलेल्या रतिलाल पावरा या स्थानिक युवकास हे निशाण आढळून आले. त्यामुळे त्या घटनेच्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या असून या परिसरात शोधमोहीम राबविली; तर आणखीन पुरावे आढळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यावेळी घडलेल्या घटनेवर अधिक प्रकाश पडून नव्याने इतिहासाचा उलगडाही होऊ शकतो असे बोलले जात आहे.

१९४३ मध्ये गोळीबार

स्वातंत्र्य संग्रामाच्या लढयात नंदुरबार जिल्ह्यात दोनदा गोळीबार झाल्याची नोंद आहे. त्यापैकी नंदुरबार येथील एक घटना तर दुसरी सातपुड्याच्या पर्वतराजीत रावलापाणी येथे २ मार्च १९४३ रोजी घडली होती. यात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारीचे निशाण आजही निझरा नदीतील खडकावर दिसतात.

मार्ग बदलला अन्‌ दिसले निशाण

रावलापाणी येथील रतिलाल पावरा या युवकाने शेतात मोठ्या कष्टाने आंब्याची बाग फुलवली आहे. त्याचे शेत घरापासून जवळपास १ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र वाटेत नदी ओलांडून, डोंगर चढून जावे लागत असल्याने शेतात जाण्यासाठी अर्धा तास लागतो. काही दिवसांपूर्वी रतिलाल घरात असतांना त्याला शेतात शेळ्या घुसून गेल्याचे दिसले. दरम्यान रतिलाल नेहमीचा रस्त्याने शेतात गेला असता तर अर्धा तास लागला असता व मुश्किलीने वाढवलेल्या आंब्याच्या बागेचे नुकसान झाले असते. त्यामुळे त्याने खडतर शॉर्ट कट रस्त्याने शेतात जाण्याचे ठरविले. शेतात जात असतांना त्याला एका खडकावर कसल्या तरी खुणा दिसल्यात, रतिलालने आधी शेतात जात शेळ्यांना हुसकावले व नंतर पुन्हा त्याच रस्त्याने परतत खुणा कसल्या आहेत; हे जाणून घेण्यासाठी निघाला. रतिलालने खडकाच्या जवळ जात त्या खुणा बघितल्या तर त्या बंदुकीच्या असल्याचे दिसून आले. आधीच्या बंदुकीच्या गोळीचे निशाण व आता आढळलेले निशाण यात खूप साम्य आहे. त्यामुळे आता आढळलेले निशाण देखील त्यावेळेच्या गोळीबाराचेच आहेत असा विश्वास रतिलालने 'सकाळ' जवळ व्यक्त केला.

आणखीन निशाण सापडण्याची शक्यता

नव्याने बंदुकीच्या गोळीचे निशाण सापडलेले ठिकाण पूर्वीच्या निशाणापासून अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण परिसर नदीचा व डोंगराच्या आहे त्यामुळे या परिसरात असा भाग मोठ्या प्रमाणावर आहे की ज्याठिकाणी आजपण कोणी सहसा जात नाही. त्यामुळे या संपूर्ण परिसरात पुन्हा शोधमोहीम राबवली तर आणखीन निशाण सापडू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यादिवशी वेळ कमी असल्याने कधी जात नाही त्या मार्गाने शेतात जाण्याचे ठरविले. वाटेत बंदुकीचे निशाण दिसून आल्याने मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे या परिसरात शोधमोहीम राबवावी जेणेकरुन आणखी नविन माहिती उजेडात येऊ शकते.

- रतिलाल पावरा, स्थानिक युवक, रावलापाणी.

रावलापाणी येथे कॅप्टन ड्युमेन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या गोळीबारात १५ आप धर्मीय शहीद झाल्याचे तत्कालीन ब्रिटिश सरकारने कबूल केले आहे. स्थानिक रतिलालने नव्याने गोळीबाराच्या निशाणी दुसऱ्या खडकांवर शोधून काढल्यात. बेछूट गोळीबाराचा हा पुरावा नव्हे तर काय?

- डॉ. कांतीलाल टाटीया, सामाजिक कार्यकर्ते, शहादा.

संपादन- राजेश सोनवणे