esakal | बाहेरून दुकान बंद आत आढळले गिऱ्हाईक; आदेश धुडकावले
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown shop

बाहेरून दुकान बंद आत आढळले गिऱ्हाईक; आदेश धुडकावले

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावत बाहेरून दुकान बंद आहे असे दर्शवीत आत गिऱ्हाइकी करणाऱ्या शहरातील एका प्रतिष्ठित कापड दुकानदाराला प्रशासनाने दंड केला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका सराफ व्यावसायिकाला देखील दंड केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर प्रतिष्ठित व्यावसायिकांना देखील अशीच अद्दल घडवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

वाढत्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आदेश काढून अत्यावश्यक सेवा, नाशवंत होणाऱ्या पदार्थांची विक्री व काही व्यवसायांना यातून सूट देत इतर सर्व दुकान बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सोमवारी (ता. १९) सकाळी तळोदा शहरातील मेन रोडवरील काही व्यावसायिक परवानगी नसताना देखील व्यवसाय करीत होते. ही बाब तहसीलदार गिरीष वखारे यांना कळल्यावर ते त्याठिकाणी पोहचले. यावेळी शहरातील एका प्रतिष्ठित कापड दुकान बाहेरून बंद होते मात्र दुकानाचा आत गिऱ्हाईक असल्याच्या संशय तहसीलदार यांना आला असता, त्यांनी दुकान उघडून पाहिल्यावर दुकानाचा आत तब्बल ८ - १० गिऱ्हाईक आढळून आले. त्यामुळे त्या प्रतिष्ठित कापड दुकानदाराला १ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. मेन रोडवरील एक सराफ व्यावसायिक देखील याच पद्धतीने व्यवसाय करताना आढळून आल्याने त्याच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अक्कलकुवा रस्त्यावरील एका नाश्त्याच्या दुकानात देखील गिऱ्हाईक आढळून आल्याने त्या व्यावसायिकाकडून देखील दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान शहरातील काही इलेट्रिक, सलून व इतर व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. त्यांना नोटीस देत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, लिपिक नितीन शिरसाठ, आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी आदी उपस्थित होते.

राजकीय हस्तक्षेपाची चर्चा

कोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरात नियमांचे पालन व्हावे यासाठी महसूल प्रशासन गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करीत आहे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांशी लागेबांधे असलेले काही व्यावसायिक आपल्यावरील कारवाई टळावी म्हणून आपल्या ओळखीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र महसूल प्रशासन त्यांना दाद देत नसल्याचे बोलले जात आहे.

यांना पण अद्दल घडवाच

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे मात्र छुप्या पद्धतीने विमल, गुटखा, सिगरेट, दारू यांची विक्री करणाऱ्यांवर देखील प्रशासनाने कारवाई करावी व त्यांना देखील अद्दल घडवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन- राजेश सोनवणे