
उपजिल्हा रुग्णालयातील कोविड तपासणी केंद्राला भेट दिली. तेथे संशयित व संपर्कातील लोकांची तपासणी सुरू होती. त्या तपासणीचे अवलोकन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यावेळी कोविड रुग्णालयाशेजारी ऑक्सिजननिर्मिती केंद्रासह तीस ऑक्सिजन बेडचे रुग्णालय अद्ययावत करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
तळोदा (नंदुरबार) : तापी नदीच्या उत्तरेकडील तिन्ही तालुके अक्कलकुवा धडगाव व तळोद्यातील कोरोना रुग्णांची सोय व्हावी म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालय मुख्यालय बनावे तसेच येथे ऑक्सिजन निर्मिती केंद्रासह तीस ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय तत्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी दिले. यामुळे जिल्हा रुग्णालयावरील भार कमी होण्यास मदत होईल व कोरोना आजारावर नियंत्रण मिळवणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी बुधवारी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे भेट दिली. यावेळी साहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ रघुनाथ भोये, तहसीलदार गिरीश वखारे, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलिस निरीक्षक नंदराज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधिकारी विजय पाटील, डॉ. अभिजित गोल्हार, डॉ. विशाल चौधरी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड तपासणी केंद्राला भेट दिली. तेथे संशयित व संपर्कातील लोकांची तपासणी सुरू होती. त्या तपासणीचे अवलोकन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यावेळी कोविड रुग्णालयाशेजारी ऑक्सिजननिर्मिती केंद्रासह तीस ऑक्सिजन बेडचे रुग्णालय अद्ययावत करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच आरोग्य, बांधकाम महसूल, नगरपालिका व पोलिस अशा सर्व विभागांनी समन्वय साधून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
मोहिम यशस्वीसाठी जनजागृती
नवीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करावा. कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी जनजागृती करून वंचित घटकांपर्यंत माहिती पोहोचवावी; तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कोविड हॉस्पिटल येथे नियुक्ती करणे संदर्भात सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील मॉड्यूलर ऑपरेशन गृहास भेट देऊन पाहणी केली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केल्याने उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
लसीकरणासाठी शुक्रवारी ड्राय रन
तळोदा तालुक्यात आठ जानेवारीला उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरणासाठी ड्राय रन आयोजित केली जाणार आहे. यामुळे लसीकरणाची रंगीत तालीम होणार असून त्याची तयारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरणाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे