
काही वर्षांपूर्वी केलवापाणी गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत होते. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सिंगा नाईक यांनी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवर स्वखर्चाने व स्वतः अथक मेहनत घेत एकट्यानेच एक विहीर बांधली,
तळोदा (नंदुरबार) : भगीरथ राजाने स्वर्गातून गंगा नदी पृथ्वीवर आणल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे, असेच एक आधुनिक भगीरथ सातपुड्याच्या दुर्गम भागात आहेत. त्यांनी आपल्या गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी, स्वकष्टाने व स्वखर्चाने विहीर बांधून ग्रामस्थांची तहान भागवली. इतकेच काय तर त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी कुंपण तयार केले, असून दगडी बांध बांधला आहे. गावातील रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देत दातृत्वाचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.
स्वातंत्र्याचा अनेक वर्षानंतरही केलवापाणी (ता. तळोदा) येथील नागरिक पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून वंचित होते, मात्र गावातील सिंगा ओल्या नाईक (वय ५०) यांनी आपल्या कर्तृत्वाने व दातृत्वाने ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वखर्चाने व स्वकष्टाने विहीर बांधली
काही वर्षांपूर्वी केलवापाणी गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत होते. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सिंगा नाईक यांनी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवर स्वखर्चाने व स्वतः अथक मेहनत घेत एकट्यानेच एक विहीर बांधली, पाईपलाइन केली व विद्युत मोटारीचा साहाय्याने गावापर्यंत पाणी पोहचविले, यासाठी त्यांना जवळपास १ लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे चार वर्षांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.
परिश्रमाने दगडी बांध, कुंपण तयार केले
सिंगा नाईक यांनी आपल्या शेतात आंबा, साग, सीताफळ, रामफळ, पेरूची १०० चा आसपास रोप लावली आहेत. लावलेली रोप जगली पाहिजे या उदात्त येथून त्यांनी २ लाख रुपये खर्च करून स्वतः मेहनत घेत तारेचे कुंपण तयार केले आहे व दगडी बांध बांधला आहे. यासाठी त्यांना पत्नी बावीबाई नाईक यांनी मदत केली. याकामी दोघांनी नदीतून दगड पायी वाहून आणलीत, याकामी दोघांना ६ - ७ महिन्यांचा कालावधी लागला.
रस्त्यासाठी स्वतःची जागा दिली
आजही केलवापाणी गावात जाण्यासाठी जेमतेम कच्चा रस्ता असून चारचाकी वाहन तिथे नेणं अतिशय जिकिरीचे आहे. पूर्वी गावात जाण्यासाठी अरुंद व खडकाळ रस्ता होता, त्यामुळे ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी खूप त्रास होत होता. ही समस्या सोडविण्यासाठी २ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शेतातील जागा दिली. त्यानंतर थेट गावापर्यंत कच्चा रस्ता तयार झाला. गावकऱ्यांचा समस्या दूर करण्यात सिंगा नाईक यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांच्याबाबत गावकऱ्यांचा मनात आदर आहे.
एखादा श्रीमंत व्यक्ती गावातील समस्या सोडवण्यासाठी पैसे देऊ शकतो, मात्र पाण्याची समस्या सोडविण्यासाठी स्वतः विहीर बांधण्याचे काम, गावातील रस्त्यासाठी स्वतःची जागा देण्याचे तसेच वृक्षांचा संवर्धनासाठी स्वकष्टाने दगडी बांध व कुंपण तयार करण्याचे काम एखादा सिंगा नाईकच करू शकतो. त्यांच्या कार्यास व दातृत्वास सलाम.
-श्यामसिंग पाडवी, ग्रामस्थ, केलवापाणी.
संपादन ः राजेश सोनवणे