
शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. रस्त्यांवर नागरिक वाहने लावून वाहतुकीची कोंडी करीत होते. पालिका चौकात हा प्रकार मोठ्या प्रमाणात होता. अल्पवयीन मुले भरधाव वेगाने वाहने चालवीत होते.
नंदुरबार : शहरात फटाके फोडणारे सायलेन्सर लावून भन्नाट वेगाने फिरणाऱ्या बुलेट, रहदारीचा विचार न करता शहरभर भरधाव दुचाकी चालवून हैदोस घालणारे तरुण, अल्पवयीन असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुलांवर वाहतूक शाखेने कारवाईचा दंडुका उगारला आहे. महिन्याभरात सात हजार, ८७२ वाहनाधाकांवर कारवाई करून आठ लाख १४ हजार १०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. रस्त्यांवर नागरिक वाहने लावून वाहतुकीची कोंडी करीत होते. पालिका चौकात हा प्रकार मोठ्या प्रमाणात होता. अल्पवयीन मुले भरधाव वेगाने वाहने चालवीत होते. शहरभर कर्कश हॉर्न वाजविणारे उनाड तरुण, बुलेट चालविणारे शौकीन आणि त्यातून होणारे अपघाताचे प्रमाण वाढले होते. मात्र, महिनाभरापूर्वी वाहतूक शाखेचा पदभार घेतलेले पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सर्वप्रथम बेशिस्त वाहतुकीवरच कारवाईचा बडगा उगारला. कायद्याचा चौकटीत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कायद्यानुसार दंड आकारून बेशिस्त वाहतुकीला वठणीवर आणण्याचा प्रयत्न सफल होताना दिसत आहे.
नियमानेच कारवाई, हस्तक्षेपाला थारा नाही
वाहतुकीचा नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला माफी नाही, मग तर राजकीय नेते असो, की पदाधिकारी. त्यांनाही नियमांचे पालन करण्याची विनंती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मोरे यांनी केली. त्यांना चुका दाखवत कायद्याचे पालन करीत होते. त्यांच्या ही कारवाई अनेकांना खटकू लागली आहे. मात्र, शहरवासीयांकडून या कारवाईचे स्वागतच होत आहे.
लायसन्स नसणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई
महिनाभरापूर्वी वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर वाहतुकीला शिस्त लावण्याचा कारवाईतून सात हजार ८७२ वाहनाधाकांवर कारवाई करून ८ लाख १४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कायदा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणे आमचे कर्तव्य आहे. शासन आदेशाचे आम्ही पालन करतो. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, म्हणजेच कारवाई होणार नाही. येत्या महिनाभरात शहरातील सर्वच वाहतुकीला शिस्त लावण्याचे नियोजन आहे.
- अविनाश मोरे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, नंदुरबार
संपादन ः राजेश सोनवणे