
गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी दुपारी साडेचारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. शनिवारी पहाटेपर्यंत पावसाने चांगलीच मुसंडी मारल्यामुळे तालुक्यातील विविध भागात पावसाने जोर धरला होता.
शहादा (नंदुरबार) : तालुक्यातील विविध भागात शुक्रवारी (ता. ८) सायंकाळपासून शनिवारी पहाटेपर्यंत अवकाळी पाऊस झाल्याने अनेक भागात शेतातील गहू, हरभरा, पपई आदी रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शिरुड, ससदे, शेल्टी या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतात सकाळपर्यंत गुडघ्याएवढे पाणी साचले होते. काही नाल्यांना पाणी आले होते. शेतात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांना सकाळी शेतीचे बांध फोडून पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. तसेच ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या शेतात असलेल्या रहिवासी झोपड्यांमध्ये पाणी गेल्याने संसारोपयोगी वस्तू ओल्या होऊन खराब झाल्या आहेत.
शहादा तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी दुपारी साडेचारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. शनिवारी पहाटेपर्यंत पावसाने चांगलीच मुसंडी मारल्यामुळे तालुक्यातील विविध भागात पावसाने जोर धरला होता. काही भागात दहा मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान, काही शेतातील गहू पूर्णतः झोपून गेलेला आहे. तसेच पपई, हरभरा आदी पिकांनाही नुकसानीची झळ पोचली आहे. शेल्टी येथील डॉ. पी. बी. पाटील, शरद पाटील, मगन पाटील, ब्रिजलाल पाटील, डॉ. रवींद्र पाटील, नितीन पाटील, अनिल पाटील यांसह काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचे नुकसान झाल्याचे समजते.
ऊसतोड कामगारांच्या झोपड्यात पाणी
दरम्यान, खासगी व सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांच्या ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यातून आलेल्या कामगारांच्या झोपड्या या परिसरात उभारलेल्या होत्या. पावसामुळे ऊसतोड कामगारांची तारांबळ उडाली होती. शेतात राहुट्यांवर सध्या वास्तव्य असल्याने या पावसामुळे अनेकांच्या कुटुंबातील संसारोपयोगी वस्तू व अन्नधान्य पावसामुळे पूर्णत: खराब झाले आहे. कडाक्याची थंडी त्यातच पाऊस यामुळे विविध आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ससदे टेंभा रस्त्यादरम्यान उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला आहे.
मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटर)
शहादा- १८, प्रकाशा- २८, कलसाडी- १६, म्हसावद- सात, ब्राह्मणपुरी- ७.३, मंदाणे- तीन, वडाळी- ११, सारंगखेडा- १२, मोहिदे- ३०.
संपादन ः राजेश सोनवणे