शटर उघडण्याचा आवाज आला मग झाली फसगत

संजय मिस्‍तरी
Friday, 1 January 2021

पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चार लाखांवरील ऐवजी लंपास केला होता. त्याच वेळी वडाळी येथेही अशाच प्रकारची चोरी झाली. मात्र तेथील कुटुंब बाहेरगावी असल्याने चोरी झाल्‍याचा निश्चित आकडा समजू शकला नाही.

वडाळी (नंदुरबार) : कोंढावळ (ता.शहादा) येथे झालेल्या धाडसी चोरीच्या उलगडा होत नाही; तोपर्यंत वडाळी येथील ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकुन चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील किराणा दुकानदार व पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे चोरांच्या डाव हुसकला. लागोपाठ चोरीचे सत्र सुरू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  
कोंढावळ येथे 29 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चार लाखांवरील ऐवजी लंपास केला होता. त्याच वेळी वडाळी येथेही अशाच प्रकारची चोरी झाली. मात्र तेथील कुटुंब बाहेरगावी असल्याने चोरी झाल्‍याचा निश्चित आकडा समजू शकला नाही. या चोरीचा उलगडा होवून पोलिसांच्या ताब्‍यात चोरटे सापडत नाही तोच दुसऱ्या दिवशी वडाळी येथील चैतन्य ज्वेलर्सचे शटर उचकून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. 

शटर उघडण्याचा प्रयत्‍न होताच
ज्वेलर्सच्या समोरील किराणा दुकान मालकांनी बाहेर शटर उघडण्याच्या आवाज येत असल्याची चाहूल लागली. त्यांनी पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांना संपर्क साधत चोरी होत असल्याची माहिती दिली. यावेळी पोलीस पाटील गोसावी, माजी सरपंच दीपक पाटील, माजी उपसरपंच गोसावी यासह ग्रामस्थांनी दुकानाकडे धाव घेतली. आपल्या दिशेने कोणीतरी येत असल्याचा सुगावा लागताच चोरट्यांनी वाहन घेऊन पोबारा केला. पोलीस पाटील गोसावी यांनी सारंगखेडा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी पेट्रोलिंग पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 

वर्षभरापासून भुरट्या चोऱ्या
वर्षभरापासून परिसरात भुरट्या चोऱ्या सुरू होत्या. मात्र नागरिक याकडे कानाडोळा करीत होते. त्याच कारणामुळे चोरीला पायबंद बसला. परंतु गेल्या दोन- तीन महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरूच आहे. अनेक वेळा गुन्हे सारंगखेडा पोलिसात दाखल आहेत. मात्र गुन्ह्याच्या उलगडा योग्य पद्धतीने होत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे. सारंगखेडा पोलीस ठाणे अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यांचा तपास होत नसल्यामुळे न्याय मागावातर कुणाकडे अशा प्रश्न उपस्थित होत असून यामुळे यामुळे चोरांना पावत आहे. तरी जिल्ह्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून नागरिकांना सुरक्षित करावे अशी मागणी होत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news vadali village second day robbery tray in jewellery shop