
तळवे (ता. तळोदा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत होते. मात्र त्यात अनेक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरोघरी जात त्यांना ऑफलाइन शिक्षण देत होते.
तळोदा (नंदुरबार) : शाळेतील चिमुकले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी तळवे (ता. तळोदा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमार्फत ‘गल्ली तेथे फळा आणि फळा तेथे शाळा’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी शाळेतील शिक्षकांना गावातील शिक्षणप्रेमींचे सहकार्य लाभत असून, विद्यार्थी, पालकदेखील या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
तळवे (ता. तळोदा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत होते. मात्र त्यात अनेक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरोघरी जात त्यांना ऑफलाइन शिक्षण देत होते. परंतु शाळेची पटसंख्या जास्त असल्यामुळे पाहिजे तेवढा वेळ प्रत्येक विद्यार्थ्याला देता येत नव्हता. त्यावर उपाय म्हणून एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय शाळेने घेतला.
शिक्षक गोकुळ बांगर यांची संकल्पना
शाळेतील शिक्षक गोकुळ बांगर यांनी गावातील गल्ल्यांमध्ये ठिकठिकाणी फळे ठेवत कोरोनाचा पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत ‘गल्ली तेथे फळा आणि फळा तेथे शाळा’ हा उपक्रम राबवित गल्ल्यांमध्ये आठ ते दहा मुलांना एकत्र करीत त्यांना शिक्षण देण्याची संकल्पना मांडली. त्यास सर्वांनी सहमती दर्शविल्याने काही दिवसांपासून तळवे गावातील चार गल्ल्यांमध्ये सोयीचा ठिकाणी फळे ठेवत मुलांना शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थी व पालकदेखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. यशस्वितेसाठी शिक्षक हेमकांत मोरे, नितीन साळी, विशाल रोडगे, सचिन वळवी, शिवाजी पाडवी आदी परिश्रम घेत आहेत.
अनेकांचे मार्गदर्शन व सहकार्य
‘गल्ली तेथे फळा आणि फळा तेथे शाळा’ हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या प्रेरणेतून व केंद्रप्रमुख गोदावरी पाटील शाळेचे मुख्याध्यापक अशोक बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, सरपंच सरस्वतीताई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ ठाकरे यांचे सहकार्य लाभत आहे. गावातील शिक्षणप्रेमी राजेश ठाकरे, शीतल वळवी, पूनम ठाकरे, सुनीता ठाकरे आदी स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर चिमुकल्यांच्या शाळा बंद असल्याने शाळेतील विद्यार्थी शिक्षणाचा मुख्य प्रवाहात टिकून राहावा, यासाठी शाळेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतल्याने कोरोनाच्या बिकट काळात देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही.
- गोकुळ बांगर, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, तळवे
संपादन ः राजेश सोनवणे