‘मला काहीच त्रास होत नाही’ ही बेफिकरी नडतेय

सम्राट महाजन
Tuesday, 6 April 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व इतर ठिकाणी प्रादुर्भाव वाढू नये किंवा होऊ नये यासाठी आपापल्या परीने उपाययोजना आखत परिश्रम घेत आहेत. मात्र त्यांच्या परिश्रमावर पाणी फेरण्याचे काम काही अतिउत्साही नागरिक करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

तळोदा (नंदुरबार) : ‘मला काहीच त्रास होत नाही, त्यामुळे माझा अहवाल निगेटिव्हच येईल,’ असे गृहीत धरून, स्वॅब देऊनही अहवालाची वाट न पाहता व घरी न थांबता, बिनधास्तपणे फिरणारे नागरिकच खऱ्या अर्थाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवीत आहेत. विशेषकरून हा प्रकार सुज्ञ व जबाबदार नागरिकच मोठ्या प्रमाणावर करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त होत आहे. नियम सर्वांना सारखेच असल्याने अशा बेजबाबदार नागरिकांनी नियम पाळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
तळोदा शहरात व तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जाणवत असून, अनेक तुलनेने लहान असलेल्या गावांमध्ये मोठ्या संख्येने व झपाट्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. नेहमीप्रमाणे आरोग्य, पालिका, पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व इतर ठिकाणी प्रादुर्भाव वाढू नये किंवा होऊ नये यासाठी आपापल्या परीने उपाययोजना आखत परिश्रम घेत आहेत. मात्र त्यांच्या परिश्रमावर पाणी फेरण्याचे काम काही अतिउत्साही नागरिक करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

स्‍वॅब देवून फिरताय बिनधास्‍त
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी आरटीपीसीआर व ॲन्टिजेन चाचणी होत असून, ॲन्टिजेन चाचणीचा अहवाल लगेच प्राप्त होत आहे, तर आरटीपीसीआर अहवालासाठी नागरिकांना काही दिवस वाट पाहावी लागत आहे. काही नागरिक ‘मला काहीच त्रास होत नाही, मला कुठलीच लक्षणे नाहीत, त्यामुळे माझा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्हच येईल’ असे गृहीत धरून, स्वॅब देऊनही मोकाट फिरत आहेत. या बेजबाबदार नागरिकांची हीच बेफिरी प्रसार वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. दिलेल्या स्वॅबचा अहवाल प्राप्त होईपर्यंत अशा बेजबाबदार नागरिकांनी थोडा संयम दाखवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
 
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. कारण गेल्या वर्षभरापासून अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या नियमित कामांसोबत कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी स्वॅब दिले आहेत, त्यांनी स्वॅबचा अहवाल येईपर्यंत घरात क्वारंटाइन होणे आवश्यक आहे, तसेच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या परंतु सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनीदेखील होम क्वारंटाइनचे नियम तंतोतंत पाळत प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. 

संपादन- राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbra news corona antigen test home quarantine