"टायमिंग' चुकल्याने विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक नुकसानीचा धोका, चार लाखांवर रिक्त जागांची भीती 

residentional photo
residentional photo

नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात विचारणा करण्याचे "टायमिंग' चुकल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा धोका बळावला आहे. 
खरे म्हणजे, दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशाच्या सुधारित प्रक्रियेचा मसुदा चर्चेसाठी पुढे आणणे अपेक्षित होते. त्यातून प्रवेशप्रक्रियेचे सुधारित सर्वमान्य धोरण स्वीकारणे हितकारक होते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. पण, त्याऐवजी "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांच्या विचारासाठी महाराष्ट्राला अपवाद केले जाईल काय, असा प्रश्‍न नव्याने तयार झाला. या साऱ्या गोंधळाच्या परिस्थितीत राज्यातील अकरावीसह व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाच्या चार लाखांहून अधिक जागा रिक्त राहण्याची भीती बळावली आहे. 

लेखी गुणांबद्दल मतमतांतरे 
अकरावी प्रवेशासाठी "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांचा विचार करण्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकाराविषयी मतभेद आहेत. "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या राज्य शिक्षण मंडळाच्या अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपर्यंत असून, नाशिकमध्ये गेल्या वर्षी 448 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे परीक्षेतील गुणवत्तेबद्दल अविश्‍वास दाखविण्याचे काहीच कारण नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. दुसरीकडे राज्यात निकाल घसरल्याने "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांचा विचार झाल्यास राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल, असा मतप्रवाह पालक, संस्थाचालकांमधून आहे. मुंबईत यापूर्वी अकरावीच्या प्रवेशावरून झालेल्या वादात मार्ग काढण्यासाठी काम पाहिलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काही जागा राखून ठेवत 95 टक्के जागांवर राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल काय, याचा सरकारने विचार करायला हवा. 
 

राज्यात 13 लाखांपर्यंत जागा 
राज्यात 13 लाखांपर्यंत अकरावीच्या जागा असून, ऑनलाइन पद्धतीने सहा महापालिका क्षेत्रांतील साडेचार ते पाच लाख जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यात 
मुंबई ः दोन लाख 80 हजार ते तीन लाख 
पुणे ः 80 हजार ते एक लाख 
नागपूर ः 40 हजार 
नाशिक ः 22 हजारांहून अधिक 
औरंगाबाद ः 30 हजार 
अमरावती ः 15 ते 18 हजार जागांचा समावेश 

गेल्या वर्षी ऑनलाइन पद्धतीतून लाखभर जागा शिल्लक राहिल्या. मार्च 2019 च्या परीक्षेत राज्यातील 12 लाख 47 हजार 903 म्हणजेच, गेल्या वर्षीपेक्षा 11 टक्के कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिक्षण मंडळाच्या विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अशी ः 
पुणे ः दोन लाख 22 हजार 654 
नागपूर ः एक लाख आठ हजार 977 
औरंगाबाद ः एक लाख 37 हजार 780 
मुंबई ः दोन लाख 75 हजार 71 
कोल्हापूर ः एक लाख 20 हजार 976 
अमरावती ः एक लाख 19 हजार 484 
लातूर ः 78 हजार 187 
कोकण ः 30 हजार 581 

नाशिक शहर आणि जिल्ह्यातील उपलब्ध अकरावीच्या जागा आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या पाहता, 22 हजारांहून अधिक जागांवर विद्यार्थ्यांचा शोध कनिष्ठ महाविद्यालयांना घ्यावा लागणार आहे. त्यातच, पदविकेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता, रिक्त जागांची संख्या वाढणार आहे. 

पुरवणी परीक्षेतील उत्तीर्णांचे प्रमाण 25 टक्के 
राज्यात गेल्या चार वर्षांमध्ये पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण सरासरी 25 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. त्यातच पुन्हा मार्चमध्ये अनुत्तीर्ण झालेले सर्वच विद्यार्थी ही परीक्षा देतात असेही नाही. यंदा राज्यात तीन लाख 70 हजार 699 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यातील निम्मे पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांना एटीकेटीसह प्रवेश देण्याची भूमिका कायम ठेवली, तरीही तिढा सुटत नाही. 

पदविकेच्या रिक्त जागांची समस्या गंभीर 
राज्यातील अभियांत्रिकी पदविकेच्या 417 संस्थांमधून एक लाख 35 हजार 149 जागा उपलब्ध आहेत. त्यातील सरकारी तंत्रनिकेतनमधील जागा भरण्यात अडचणी नसल्या, तरीही खासगी संस्थांमधील रिक्त जागांची समस्या दर वर्षी वाढतच आहे. नाशिक विभागात 2018-19 मध्ये 65 टक्के जागा रिक्त राहिल्या. 2017-18 मध्ये हेच प्रमाण 60, तर 2016-17 मध्ये 55 टक्‍क्‍यांपर्यंत होते. म्हणजेच, यंदा पदविकेच्या रिक्त जागांचे प्रमाण 70 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत पोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय बोर्डांच्या लेखी गुणांबद्दल केंद्राशी चर्चा करण्याची वेळ चुकली. त्यामुळे विद्यार्थी, पालक, संस्थाचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. रखडणाऱ्या प्रवेशप्रक्रियेतून अकरावीचे वर्ग उशिरा सुरू होतील. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांपुढे असेल. त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. हा गोंधळ टाळण्यासाठी "वन नेशन-वन सिलॅबस ऍन्ड वन एक्‍झाम' या धोरणाचा अवलंब करायला हवा. 
-प्रा. डॉ. संजय शिंदे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ 
 

अंतर्गत गुण बंद करण्याचा निर्णय घेतला हे चांगले आहे. त्यामुळे निकाल कमी लागल्याने अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला विलंब करणे यातून शैक्षणिक वर्ष पुढे जाणार असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. 
-प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाशिक एज्युकेशन सोसायटी 

अभियांत्रिकी पदविकेच्या प्रवेशासाठी 30 मेपासून ऑनलाइन अर्जप्रक्रियेला सुरवात झालीय. ही लिंक 18 जूनपर्यंत खुली राहणार आहे. त्यानंतर गुणवत्तायादी तयार होईल. मग प्रवेशाचे कॅपराउंड सुरू होतील. या प्रक्रियेत गुणवत्तायादी सरकारच्या निर्णयानुसार तयार केली जाईल. 
-डी. पी. नाठे, तंत्रशिक्षण सहसंचालक 
 
अकरावीची प्रवेशप्रक्रिया सरकारच्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्यात राबविण्यात येईल. त्यासंबंधीचा निर्णय लवकर अपेक्षित आहे. त्यानंतर प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होईल. 
-दिनकर पाटील, माध्यमिक शिक्षण संचालक 
 
ऑनलाइन पद्धतीने सहा महापालिका क्षेत्रांत अकरावीच्या प्रवेशासाठी भाग एकचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सर्वसाधारणपणे पुढील आठवड्यात दिले जाईल. सहा शहरांमध्ये पाच लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येते. 
-मीनाक्षी राऊत, उपसंचालक, ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या प्रमुख 

अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या विलंबामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्‍त तासिका घ्याव्या लागतील. मुळातच, दहावीच्या निकालानंतर लगेच प्रवेशाला सुरवात व्हायला हवी होती. एकाच वेळी उच्च शिक्षण व कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशांमुळे प्रक्रियेत समाविष्ट सरकारी यंत्रणेवरही अतिरिक्‍त ताण येणार आहे. 
-डॉ. चंद्रकांत दिघावकर, प्राचार्य, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, नाशिक 

अकरावी प्रवेशासाठी तोंडी परीक्षेचे गुण वगळण्याचा निर्णय परीक्षांआधी जाहीर करायला हवा होता. एका गुणामुळे बदलणाऱ्या "कट-ऑफ'वर प्रवेश निश्‍चित होतात. त्यामुळे अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेशापासून मुकावे लागण्याची भीती आहे. सूक्ष्म नियोजन करून कुठलाही निर्णय घेणे अपेक्षित होते. 
-डॉ. सुरेखा कुलकर्णी, मुख्याध्यापिका, होरायझन अकादमी-आयसीएसई बोर्ड 
 

दहावीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस होऊनही अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. व्यवस्थित नियोजन करत निकालानंतर वेळापत्रक जाहीर करता आले असते. तसे न घडल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल. 
-प्रशांत हिरे, पालक, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com