स्मिताताईंमधील रणरागिणीचा झाला 'उदय' 

उमेश काटे
Friday, 28 February 2020

तीन महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्यावरही केवळ शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी आपले दुःख विसरून आमदार स्मिता वाघ यांनी रणरागिणीचे रूप घेऊन राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केलीत. "असं कसं देत नाहीत... घेतल्याशिवाय राहत नाही', अशा घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधून घेतले.

दुभंगली धरणी माता.. फाटले आकाश गं.. कधी संपणार नारी.. तुझा वनवास गं... या गीताप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीतही महिला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध करीत आहेत. महिलांची विविध रूपं पुरुषांच्या दृष्टीने कायमच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. आपल्या आयुष्यात, संसारात एवढ्या विविधांगी भूमिका करून महिला ही कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रातही कर्तृत्व गाजवीत आहेत. 

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अमळनेर बाजार समितीचे माजी सभापती (कै.) उदय वाघ यांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने अमळनेरसह जळगाव जिल्ह्यात एक पोकळी निर्माण झाली. आमदार स्मिता वाघ यांनी आपले पती (कै.) उदय वाघ यांच्यासमवेत जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. उदय वाघांच्या निधनानंतर आमदार स्मिता वाघ डगमगल्या नाहीत. दुःखातून स्वतःला सावरत जनतेचे व्रत व पक्षकार्यासाठी पती निधनानंतर अवघ्या अठरा दिवसात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या. एवढ्यावरच न थांबता भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या दिल्ली येथे ठाण मांडून होत्या. त्यांनी दिल्ली येथील त्रीनगर, विश्रामनगर, चंदननगर आदी भागातील उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळून खानदेशची शान वाढविली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांसमवेत स्मिता वाघ यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, महिलांवरील वाढते अत्याचार थांबले पाहिजेत, अशा विविध विषयांवर घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या शासनाचे लक्ष वेधून घेतले. 

श्रीमती वाघ यांनी विधानपरिषदेतही पांझरा, माळण नदीजोड प्रकल्पासाठी आवश्‍यक निधीसाठी तसेच महिलांच्या सुरक्षेकरिता कार्यान्वित वन स्टॉप सेंटरबाबत तारांकित प्रश्‍नही उपस्थित केला. अमळनेर तालुक्‍यातील पांझरा, माळण नदीजोड प्रकल्पासाठी आवश्‍यक निधी मिळवून जल उपलब्धता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासनाला साकडे घातले. यावर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत जिल्हास्तरीय नदीजोड योजनेचा जिल्हा योजनेत समावेश करून याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जलसंपदा विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करण्याबाबतचा मार्गदर्शन सूचनाही केल्या आहेत. 

गल्ली ते दिल्ली प्रवास 
काही महिन्यांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरचा कर्ता पुरुषच काळाने हिरावून घेतला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही घराची घडी बसवून राजकीय घडीही सुस्थितीत आणण्याचे काम त्यांनी केले. पक्षनिष्ठा दाखवत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास त्यांनी गेल्या महिन्यात केला. अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांबाबत धरणे आंदोलनही केले. नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी पुन्हा त्या सज्ज झाल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner MLA smita wagh political carrer husband uday wagh death