
अमळनेर ः यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. हतनूर धरणातून ४१ दरवाजे पूर्ण उघडल्याने तापी नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. मात्र, खानदेशातील महत्वाकांक्षी समजला जाणारा पाडळसे प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षापासून ‘जैसे थे‘च असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. या धरणाचे काम थोडेही झाले असते, तर किमान अमळनेर शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत झाली असती.
निम्म तापी प्रकल्पाच्या कामास १९९९ ला सुरवात करण्यात आली. त्यावेळी केवळ सहा लाख रुपयांची तरतूद करून धरणाच्या कामाला सुरवात झाली. त्यानंतर १९९९ ते २०१५ या काळात ३३५ कोटी, २०१५- १६ मध्ये १४ कोटी, तर २०१६-१७ मध्ये सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. तळाची पातळी १३२.५१ मीटरपासून सांडवा बांधकाम मुर्धा पातळी १३९.२४ मीटर, सर्व २३ गाळे आणि प्रस्तंभ १४० मीटरपर्यंत पूर्ण झालेले होते. १२.९७ दलघमी पाणीसाठा झालेला असून, प्रकल्पापासून कलाली डोहापर्यंत बॅकवॉटर होते. मात्र, मे २०१४ अखेरीस धरणाची स्थिती जशी होती तशी पाच वर्षानंतर ‘जैसे थे‘च आहे. मुळात २०१४- १५ मधील कामाच्या नियोजनात सांडवा बांधकामात उंबरा पातळी १३९.२४ मीटरपासून १९० मीटर उंचीचे स्टॉपलॉग गेट टाकून १४१.१४ मीटर तलांकापर्यंत नेल्यास २९.९२ दलघमी जलसाठा करण्याचे नियोजन होते. मात्र, शासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधींची हतबलता व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यशून्यता यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे रखडला. त्यामुळे एक इंचही बांधकाम झाले नाही. पर्यायाने बांधकामाच नसल्याने यंदाच्या पावसाळ्यातील लाखो लीटर क्युसेक पाणी वाया गेले आहे. पुनर्वसनाच्या नावाखाली दिशाभूल करत हा प्रकल्प थंड बस्त्यात ठेवण्यात आला. जर शासनाच्या निधीतून किमान स्टॉपलॉग गेटचे काम झाले असते तर किमान वाया जाणारे पाणी अडून जलसाठा करता आला असता. या जलसाठ्यातून शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्नही सुटला असता. मुळात हे काम पूर्ण झाले असते तर सुमारे २ हजार ६०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली असती. मात्र, आता तालुक्यातील नागरिकांना या वाया जाणाऱ्या पाण्याकडे बघूनच डोळ्यात पाणी येत आहे.
नाव मोठे अन लक्षण खोटे
१९९९ ला तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या काळात पाडळसे प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, त्यांनीही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याने काम थंड बस्त्यात राहिले. त्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात माजी आमदार साहेबराव पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी मिळविल्याने धरणाचे काम काही प्रमाणात मार्गी लागले. २०१४ ला भाजप- शिवसेना युतीचे शासन आल्यावर तरी काम मार्गी लागेल असे वाटले होते. त्यातच जिल्ह्याला गिरीश महाजन यांच्या रूपाने जलसंपदामंत्री पद मिळाले. मात्र, त्यांच्या कडूनही मोठ्या प्रमाणात निराशा पदरी पडली आहे. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असतानाही हे धरण पूर्ण होत नाही. त्यामुळे अमळनेरसह पारोळा, चोपडा, शिंदखेडा, धुळे या तालुक्यातील जनतेने नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.