तलवार घेवून ते आले रेल्वे थांबविली अन्‌ घडले थरारकच... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

ट्विटरवर पोस्ट व्हायरल 
लुटमारीच्या घटनेनंतर एका प्रवाशाने ताप्ती गंगा एक्‍स्प्रेसचा फोटो काढून ट्विटरवर अपलोड केला. हा फोटो रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे पोलिसांच्या विविध हॅश टॅगला जोडून तक्रारही केली आहे. 

जळगाव/अमळनेर : अमळनेरला आज चार शस्त्रधारी दरोडेखोरांनी छपरा जंक्‍शन-सुरत ताप्ती गंगा एक्‍स्प्रेसमध्ये लूटमार केली. हातात तलवार व चाकू घेऊन इंजिनपासून दुसऱ्या-तिसऱ्या असलेल्या सर्वसाधारण डब्यात (जनरल) शिरून प्रवाशांना ओलिस ठेवत शस्त्रधारी दरोडेखोरांनी लूटमार केली. या घटनेत चार प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम लुटून नेली. यासंदर्भात मनमाड लोहमार्ग पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात येऊन दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेले गुंड रेल्वेस्थानकावरच लूटमारसह तृतीय पंथीयांच्या टोळ्यांचे प्रमुख असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
जळगाव स्थानकातून ताप्ती गंगा एक्‍स्प्रेस सुटल्यानंतर अमळनेर स्थानक येण्यापूर्वीच रेल्वेचा वेग कमी झाल्याने चार शस्त्रधारी दरोडेखोर सर्वाधिक गर्दी असणाऱ्या सर्वसाधारण डब्यात शिरले. त्यात एकाच्या हातात तलवार, तर दोघा-तिघांच्या हातात चाकू होता. दिसेल त्याला मारहाण करत लूटमारही करीत होते. या प्रकारामुळे प्रवाशांकडून विरोध झाल्याने त्यांच्यावर चाकूने वार करणे सुरू केले. त्यात एका प्रवाशाच्या हाताचा अंगठा कापला गेला, दुसऱ्याच्या खांद्याला, तर आणखी एकाच्या छातीवर वर्मी घाव घालण्यात आला. अशाप्रकारे एकाच वेळी तीन प्रवाशांवर चाकूहल्ला करत संबंधित चौघांनी दहशत माजविल्याने प्रवाशी मोठ्या प्रमाणात भेदरले. यात मिळतील त्यांच्याकडून पैसे व इतर चीजवस्तू लुटून स्थानकात रेल्वे पोहोचण्यापूर्वीच चौघांनी खाली उडी घेऊन पलायन केले. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयीत स्थानिक व रेल्वे पोलिसांच्या परिचयाचे असून, त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप खात्यांतर्गत दखल घेतलेली नाही. 

जखमी प्रवाशांवर उपचार 
शस्त्रधारी दरोडेखोरांसमवेत झालेल्या झटापटीत राजस छदिलाल यादव (वय 18, परसीतपूर, जि. बांधा- उत्तर प्रदेश, ह.मु. सुरत), धुरेंद्रकुमार बलेश्‍वर महातो (वय 19) त्याचा चुलतभाऊ गोलूकुमार भरत महतो (वय 18, दोघे रा. धरमपूर, जि. छपरा) हे जखमी झाले असून, त्यांचे मोबाईल आणि रोख साडेसदतीस हजार रुपये लुटून नेल्यावर तिघे अमळनेर स्थानकात उतरल्यावर त्यांच्यावर शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

रेल्वे पोलिसांकडून जखमींची विचारपूस 
जखमींच्या जबाबावरून लोहमार्ग पोलिस ठाणे नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे तपास करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता रेल्वे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे, निरीक्षक दिलीप गढरी यांनी भेट दिली. जखमींची चौकशी करून विचारपूस केल्यावर त्यांना संशयीत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची छायाचित्रे दाखविण्यात आल्यावर त्यांनी स्थानिक टोळीतील गुन्हेगारांना ओळखल्यावर रेल्वे पोलिसांनी त्यांना अमळनेरमधील तांबापुरा भागातून ताब्यात घेतले. 

पोलिस चौकीवर हल्ला करणारेच संशयीत 
अमळनेर रेल्वेस्थानक गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचा अड्डाच बनला असून, रेल्वे पोलिसांच्या सहकार्यातून धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये तृतीय पंथीयांच्या टोळ्यांचे म्होरके अर्थात गुंडच लूटमार करतात. फलाटावरच पोलिसांना हप्ता पुरविला जात असल्याने छोट्या-मोठ्या घटनांकडे ते दुर्लक्ष करतात. त्यातूनच रेल्वे लुटण्यापर्यंत या दरोडेखोरांनी हिंमत दाखविली असून, अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहुल पंढरीनाथ पाटील ऊर्फ रामजाने, तन्वीर शेख यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा साथीदार राकेश येवले पळून जाण्यात यशस्वी ठरला. रामजाने व त्याच्या साथीदारांनी साधारण एक-दीड वर्षापूर्वी चक्क जीआरपी पोलिस चौकीवर हल्ला करून कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वर दाखवून मारहाण केली होती. मात्र, तेव्हाही त्याच्यावर ठोस कारवाई न झाल्याने त्याच्या टोळीने अमळनेर ते सुरत आणि जळगावपर्यंत बऱ्यापैकी जम बसविला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner railway station tapti ganga gagn