वडीलांचा मृत्यू..पण ना खांदा देता आला ना झाले अंतिम दर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

वडील जाण्याचे दुःख मनात होते. पण जाता आले नाही. अंतिम समयी खुप सेवा केली जाते. पण वडीलांची अंतिम सेवा करण्याची संधी देखील दोन्ही मुलांना मिळाली नाही. सेवा तर दूरची गोष्ट राहिली, अंतिम दर्शन करणे देखील घेणे जमले नाही.  

अमळनेर : मृत्यू कधी गाठेल याबद्दल अनिश्‍चितता आहे. कोरोना व्हायरसने सारे भयभीत असून त्याला रोखण्यासाठी संचारबंदी घालण्यात आली आहे. यामुळे सारेजण ज्या ठिकाणी होते; तेथेच राहिले. अशा परिस्थितीत वडीलांचा मृत्यू झाला असताना वडील जाण्याचे दुःख मनात होते. पण जाता आले नाही. अंतिम समयी खुप सेवा केली जाते. पण वडीलांची अंतिम सेवा करण्याची संधी देखील दोन्ही मुलांना मिळाली नाही. सेवा तर दूरची गोष्ट राहिली, अंतिम दर्शन करणे देखील घेणे जमले नाही.  

चार खांदेकरी ...एक मडके धरी... बाबा चालले देवा घरी...आयुष्यात कोणावर काळ आणि वेळ केव्हा येईल, हे कधीच सांगता येणार नाही. माणसाच्या जीवनात सूख आणि दुःख अनपेक्षित पणे केव्हा येईल सांगता येत नाही. अशीच घटना झाडी (ता. अमळनेर) येथे घडली. येथील जगन पितांबर मिस्तरी (वय 65) यांचे काल दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. 

ग्रामस्थच झाले खांदेकरी 
सध्यस्थीतीत सर्वत्र देशाच्या काना कोपऱ्यात कोरोना आजाराने थैमान घातल्याने, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे अंमलबजावणी सर्वत्र होत आहे. यामुळे मयत जगन मिस्तरी यांचे दोघे मुले यात थोरला संतोष मिस्तरी, लहान सुकदेव मिस्तरी सुरत येथे कामाला आहेत. त्यांना आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सुरतहुन झाडी येथे ताबडतोब येणे शक्य नसल्याने झाडी येथील पत्रकार संभाजी सुकलाल देवरे यांनी अमळनेर येथून अंत्यसंस्काराचे साहित्य आणीत त्यांचे मोठे बंधू शिवाजी देवरे यांनी जगन मिस्तरी याना यावेळी खांदेकरी होऊन अग्निडाग दिला. तर संभाजी देवरे त्यांचे वडील सुकलाल काळू देवरे व पोलीस पाटील प्रवीण धनगर यांनी खांदा देत गावातील मोजक्याच लोकांनी उपस्थिती देत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोलमजुरी करून सुरू होती गुजरान 
मयत म्हातारा हे दोघे पती-पत्नी  मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. कोरोना आजारामुळे कुणीही इकडे तिकडे येऊ शकत नसल्याने वडिलांच्या शेवटच्या क्षणाला मुले येऊ न शकल्याने त्यांच्या आईला व मुलांना हे दुःख मनाला हेलावणारे होते. मात्र आजही माणुसकी जिवंत आहे. याचेच उदाहरण झाडी ग्रामस्थानी दाखवीत. देवरे बंधू  यांनी खरोखर मानवता हाच खरा धर्म याला जोपासत गावातील वृध्द म्हाताऱ्याला शेवटच्या क्षणी पाणी आणि अग्निडाग देऊन हा महाराष्ट्र खरोखर राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा संस्काराचा आहे. याचा आजही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 

मुलांना आणण्यासाठी दिले पत्र 
दरम्यान मयत जगन मिस्तरी यांचे दोघे मुले व त्यांचा परिवार सुरत येथे असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या लेखी पत्र देऊन गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आणण्यासाठी सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Amalner The villagers gave shoulder to old man deth