जिल्ह्यात दीड हजारांवर रक्तपिशव्यांचा साठा 

चेतन चौधरी
गुरुवार, 9 एप्रिल 2020

गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या आणि अपघाताचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आशादायक चित्र आहे.

भुसावळ  : राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी भीतीपोटी रक्तदान करणाऱ्यांची संख्या मात्र, कमी होत असल्यामुळे राज्यात रक्त साठ्यात तुटवडा भासण्याचे संकट उभे असताना आरोग्यमंत्र्यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते, त्यास प्रतिसाद देत, ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील रक्तसाठ्याची माहिती घेतली असता, ७ प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये दीड हजारांवर पिशव्या रक्तसाठा शिल्लक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या आणि अपघाताचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आशादायक चित्र आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारने देशभरात लॉकडाउंन घोषित केले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, इतर सर्व दुकाने बंद आहेत. रस्त्यावर शुकशुकाट असून, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे मोजकेच वाहने रस्त्यावरून धावताना दिसतात. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी झाली. केवळ कोरोनाचा संशय असलेले रुग्णच सरकारी दवाखान्यांमध्ये येत आहे. किरकोळ आजार असल्यास लोक दवाखान्यात न जाता, घरीच इलाज करण्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा शिल्लक आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली. त्यामुळे गंभीर शस्त्रक्रियेच्या रुग्णासह, कॅन्सर, थॅलेसेमिया, हिमोफेलिया व सिकलसेलचे रुग्ण अडचणीत आल्याचे चित्र होते. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विविध सामाजिक संस्था रक्तदान शिबिर घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा शिल्लक आहे. 

रक्ताच्या मागणीत घट 
सद्यःस्थितीत अपघात तसेच गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया बंद असल्याने रक्ताच्या मागणीत घट झाली. केवळ गर्भवती महिला, थॅलेसिमिया आदी रुग्णांसाठीच रक्ताची गरज भासत आहे. पूर्वी दिवसाला सरासरी शंभर ते दीडशे पिशव्यांची गरज भासत होती. मात्र, आता त्यात ८० टक्के घट झाली आहे. 

रक्तपेढीतील साठा 
जळगाव शहरातील गोळवलकर रक्तपेढी - १९९ बॅग, रेडक्रॉस सोसायटी- ६२० बॅग, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी- ९३ बॅग, जळगाव ब्लड बँक- २७८ बॅग, भुसावळ शहरातील धन्वंतरी रक्तपेढी-११० बॅग, जीवनश्री रक्तपेढी (अमळनेर)- ३६ बॅग, जैन रक्तपेढी (चोपडा)- ६१ बॅग रक्तसाठा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Bloodstock reserves over one and a half thousand in district