नेहेते परिवाराने जोपासला दधींचीचा वारसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

देहदानाची ही संकल्पना आपल्या समाजात अजूनही म्हणावी तशी रुजलेली नाही. कुणी धर्माच्या विरोधात म्हणून तर कुणी आप्तस्वकीयांच्या देहाची चिरफाड करु द्यायला मन धजावत नाही, म्हणून देहदानाला विरोध करते. मात्र पाडळसे (ता. यावल) येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक देवचंद नेहेते (वय ९२) यांचे १ मार्चला वृद्धापकाळामुळे निधन झाले.

भुसावळ : आपले आयुष्य, आपला वेळ इतरांच्या भल्यासाठी खर्च करणारी, अनेक देवमाणसे आपल्या समाजात आहेत. गरजू व्यक्तींची मदत करुन दुसऱ्यांच्या कामी येण्याचा संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो. देहदानाच्या मार्गाने मनाचे मोठेपण मरणोत्तरही जपणारे, पाडळसे (ता. यावल) येथील देवचंद जयराम नेहेते म्हणजेच आजचे दधीची होय. त्यांचा आदर्श घेत, पत्नी, सुन आणि मुलीनेही देहदानाचा संकल्प केला.
देहदानाची ही संकल्पना आपल्या समाजात अजूनही म्हणावी तशी रुजलेली नाही. कुणी धर्माच्या विरोधात म्हणून तर कुणी आप्तस्वकीयांच्या देहाची चिरफाड करु द्यायला मन धजावत नाही, म्हणून देहदानाला विरोध करते. मात्र पाडळसे (ता. यावल) येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक देवचंद नेहेते (वय ९२) यांचे १ मार्चला वृद्धापकाळामुळे निधन झाले. मृत्यूनंतर आपला देह इतरांच्या कामी यावा, या परोपकारी भावनेमुळे त्यांनी मृत्युपूर्वीच देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या नातेवाईकांनी जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटल मध्ये त्यांचा देहदान केला.
यावल तालुक्यातील पाडळसा या लहानशा गावी शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या देवचंद नेहेते हे मुळातच आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांनी बरेच वर्षे चिनावल (ता. रावेर) येथील जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. परिसरातील गावांमध्ये त्यांना सर्व ‘गुरुजी’ म्हणूनच ओळखत. त्यांना एक मुलगा, दोन मुली असे तीन अपत्य. आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलांनी देखील शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला, मुलगा आणि एक मुलगी वेगवेगळ्या ठिकाणी आपले ज्ञानदानाचे कार्य करीत होते. अतिशय सुखी आणि सधन परिवाराला अचानक कुणाची दुष्ट लागली अन्‌ होत्याते नव्हते झाले. जळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला नातू ललित हा २००१ मध्ये बेपत्ता झाला. त्यानंतर २०११ मध्ये मुलगा लक्ष्मण नेहेते यांचे दुर्दैवी निधन झाले.

परिवार शिक्षकीपेशात
‘गुरुजीं’ची मोठी मुलगी शोभा दिलीप भोरटक्के या जळगाव येथील डाक कार्यालयात खजिनदार तर जावई दिलीप भोरटक्के हे जळगाव येथील मु. जे. महाविद्यालयातून रजिस्ट्रार पदावरुन सेवानिवृत्त झाले. लहान मुलगी उज्ज्वला चोपडे या जोगेश्‍वरी (मुंबई) येथे मुख्याध्यापिका आहेत. तर जावई अशोक चोपडे अंधेरिला शिक्षक होते. आजारपणामुळे ‘गुरुजी’ गेल्या दोन वर्षांपासून जळगाव येथे आपल्या मुलीकडे राहत होते. यावेळी त्यांनी आपल्या देहदानाची इच्छा बोलून दाखविली होती. त्यानुसार त्यांच्या मृत्यूनंतर गोदावरी हॉस्पिटल मध्ये त्यांचे देहदान करण्यात आले. तर मृत्यूनंतर त्यांचा क्रियाकर्म धार्मिक विधीप्रमाणे पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आध्यात्माची आवड
गुरुजींना आध्यात्माची आवड होती, त्यामुळे दरवर्षी ते पंढरपूरला वारीत जायचे. चिनावल येथेही नेहमी भावगत कथा, रामायण कथा पारायण करायचे. जळगाव येथे मुलीकडे असताना आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही त्यांनी आपली आध्यात्मिकता जोपासत असत, मृत्यूच्या आठ दिवसांपूर्वीच त्यांनी भागवत पारायण केले होते.

परिवाराचेही देहदान
गुरुजी देवचंद नेहेते यांच्या आदर्श घेत, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा नेहेते (वय ८२), सून सुलभा नेहेते आणि मुलगी उज्ज्वल चोपडे यांनीही देहदानाचा संकल्प केला आहे. यानुसार ते आपल्या मृत्यूनंतर आपला देह गरजू रुग्णांसाठी दान करणार असल्याचे त्यांचे जावई अशोक चोपडे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal nehete family Body donat