अंधाराला भेदले... प्रोबेशनरी ऑफिसर पदाला गवसणी 

residentional photo
residentional photo

नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली... त्यावरच न थांबता पुढे बॅंकेच्या परीक्षा देत प्रोबेशनरी ऑफिसर पदाला गवसणी घातली... आता भारतीय स्टेट बॅंकेच्या मेरी शाखेत कार्यरत आहेत... "यूपीएससी'च्या माध्यमातून यापुढे सनदी अधिकारी होऊन मराठवाडा या जन्मभूमीची सेवा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या चंद्रशेखर बोईनवाड या अंध तरुणाच्या जिद्दीची ही कहाणी... 
 

  चंद्रशेखर बोईनवाड मुळचा बाऱ्हाळी (ता. मुखेड, जि. नांदेड) गावचा. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झालं. पुढे शिकायचं म्हणून नाशिक गाठलं. 2013 मध्ये शासकीय वसतिगृहात राहून पदवीचे शिक्षण घेत असतानाच कमल नारायण उईके या अमरावतीच्या मित्राने स्पर्धा परीक्षा देण्याचा आग्रह धरला. त्यासाठी त्यानेच मला परीक्षेसाठी लागणारे साहित्य पुरवले. काही रेकॉर्डिंग करून दिले. पदवी झाल्यानंतर दोघेही पुण्यात अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलो. त्याचवेळी मंत्रालयातील लिपिक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालो. तेथे नियुक्ती घेतानाच मित्राने सांगितले, की ही सुरवात आहे, शेवट नाही. त्यामुळे थांबू नको. काही वर्षे मंत्रालयात नोकरी केल्यानंतर राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात रुजू झालो. 2018 मध्ये बॅंकेची प्रोबेशनरी ऑफिसर पदाची परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यामुळे जानेवारी 2019 ला आधीच्या नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय स्टेट बॅंकेच्या मेरीच्या शाखेत रुजू झालो. 
 

 बॅंकेत डिजिटल खूप शिकता येते आणि समाजाची सेवा करता येत असल्याचा आनंद होत असल्याचे त्याने सांगितले. मात्र प्रोबेशनरी ऑफिसरपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अंध असल्यामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात मला कुटुंबीयांची खूप साथ मिळाली. मी आणि माझा पाठचा भाऊ आम्ही दोघेही जन्मतःच अंध असल्याने सर्वांनाच या गोष्टींचा स्वीकार करण्यात सुरवातीचा काळ खूप जड गेला. त्यानंतर आणखी दोन भाऊ झाले. ते सामान्य आहेत. पण कुटुंबाने खूप प्रेम दिले. आजोबांनी लहानपणीच शेतावर नेऊन शेतातील सर्व गोष्टींची स्पर्शाने ओळख करून दिली. प्रत्येक खडतर प्रसंगात कुटुंब पाठीशी उभे राहिले. आज मी नाशिकमध्ये नोकरी करतो आणि बाकीचे तिघे भाऊदेखील माझ्याकडेच असून, तिघेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. पाठचा भाऊ अंध आहे. त्यानेही पदवीचे शिक्षण पूर्ण करून तोही स्पर्धा परीक्षा देत आहे. 

वाचनाची आवड जोपासली 
लहानपणापासून वाचनाची आवड. त्यातून एक हजार 400 पुस्तके माझ्या संग्रही असल्याचे चंद्रशेखर सांगतो. यूपीएससी परीक्षांची तयारी सुरू आहे. सनदी अधिकारी होऊन माझ्या मराठवाड्यातील जन्मभूमीची सेवा करण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. 

मित्रामुळेच जीवनाला आकार 

आपल्या यशाचे सर्व श्रेय चंद्रशेखर मित्र कमल नारायण उईके याला देतो. या मित्रामुळेच मला स्पर्धा परीक्षांची गोडी लागली. त्यानेच माझा अभ्यास घेतला. अर्थशास्त्राच्या आकृत्या त्याने मला वसतिगृहातील झाडूच्या काड्यापासून तयार करून स्पर्शाने शिकवल्या. त्यामुळे मी आज जे काही आहे ते केवळ त्याच्यामुळेच. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com