चाळीसगावात बसचालकावर गुप्तीने वार 

गणेश पाटील
गुरुवार, 15 मार्च 2018

ओव्हरटेक केल्याचा राग येऊन दुचाकीवरील तिघा अज्ञातांनी बस अडवली व चालक शंकर महाजन हे बसमधून उतरत नाही तोच एकाने त्याच्यावर गुप्तीने वार केला.

चाळीसगाव (जि. जळगाव) : रस्त्याने ओव्हरटेक करण्याच्या कारणावरुन दुचाकीवरील अज्ञात तरुणांनी बस चालकावर गुप्तीने वार केल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. चालकावर येथील वाय. पी. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

चाळीसगाव आगारातून हातगाव- घोडेगाव ही बस (क्रमांक- एम. एच. 40, 9052) नेहमीप्रमाणे निघाली. हिरापूर रस्त्यावरुन जात असताना वीज सबस्टेशनजवळ बसच्या पुढे चालणाऱ्या दुचाकीला बसचालक शंकर महाजन यांनी ओव्हरटेक केले. त्याचा राग येऊन दुचाकीवरील तिघा अज्ञातांनी बस अडवली व चालक शंकर महाजन हे बसमधून उतरत नाही तोच एकाने त्याच्यावर गुप्तीने वार केला. महाजन यांच्या पायाला गुप्तीचा वार लागला. या प्रकारानंतर दुचाकीवरील दोघे पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर प्रवाशांनी जखमी चालक महाजन यांना रुग्णालयात दाखल केले. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील अज्ञात तिघांच्या हातात धारदार शस्त्र होते. हा प्रकार आगारातील वाहक व चालकांना कळताच त्यांनी चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आगार प्रमुखांनी सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस न धरता घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला असून पोलिस आगारात पोचले असून पुढील योग्य ती कार्यवाही सुरु केली आहे.

Web Title: marathi news chalisgaon attack fight police bus driver