तालुकास्तरावर कोरोना तपासणीसाठी प्रयत्नशील : आरोग्य मंत्री राजेश टोपे 

आनन शिंपी
गुरुवार, 30 एप्रिल 2020

राज्यात काही ठिकाणी असे खासगी हॉस्पिटल्स अधिग्रहीत करीत आहोत. सध्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची तपासणी होत आहे. जळगावला देखील मंजुरी दिलेली आहे.

चाळीसगाव : राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या अधिक आहे, अशा तालुकास्तरावर कोरोनाची तपासणी करता यावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मालेगाव येथून जालना येथे जात असताना मंत्री टोपे यांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या राजगड’ या निवासस्थानी भेट दिली. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, जिल्हा परिषदेचे सदस्य शशिकांत साळुंखे, कळंत्री शाळेचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, नगरसेवक भगवानसिंग राजपूत, रामचंद्र जाधव, शाम देशमुख, अण्णा कोळी, सूर्यकांत ठाकूर, रोशन जाधव, दीपक पाटील, जगदिश चौधरी आदी उपस्थित होते. राजीव देशमुख यांनी मंत्री टोपे यांना जळगाव जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. चाळीसगावला कोरोनासंदर्भातील संशयित रुग्ण आढळून आला तर त्याला थेट जळगावला पाठवावे लागते. त्यामुळे शहरातील सर्व सोयीयुक्त असलेले खासगी हॉस्पिटल अधिग्रहीत करावे, अशी मागणी राजीव देशमुख यांनी केली. त्यावर बोलताना मंत्री टोपे यांनी सांगितले, की राज्यात काही ठिकाणी असे खासगी हॉस्पिटल्स अधिग्रहीत करीत आहोत. सध्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची तपासणी होत आहे. जळगावला देखील मंजुरी दिलेली आहे. मात्र, ज्या तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या सर्वाधिक आहे, अशा तालुक्यांच्या ठिकाणी देखील कोरोनाची तपासणी करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलली आहेत. सद्यस्थितीत आपल्याकडे पुरेसे किट्स उपलब्ध आहेत असे सांगून मंत्री टोपे यांनी पाचोरा येथे आढळून आलेल्या कोरोनाबाधीत रुग्णसंदर्भात माहिती जाणून घेतली. सध्याच्या परिस्थितीत विशेषतः ज्येष्ठांनी काळजी घ्यावी, पोलीस खात्यातही 50 ते 55 वय असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरच्या ड्युटी लावणे आपण बंद केले आहे असे सांगून मंत्री टोपे यांनी बाहेर फिरणे टाळावे व तोंडाला ममास्क लावावा असे आवाहन केले. चर्चेदरम्यान डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी चाळीसगाव तालुक्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मंत्र्यांना माहिती दिली. चाळीसगावला कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले असून विविध ठिकाणी प्रस्तावित चारशे बेडची व्यवस्था करण्यात आली असून ग्रामीण रुग्णालयाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आल्याचे त्यांनी सांगितले. हा सुसंवाद साधल्यानंतर राजीव देशमुख यांच्याकडे जेवणाचा आस्वाद घेऊन मंत्री टोपे पुढे मार्ग रात्रीच पुढे मार्गस्थ झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon helth minister rajesh tope tour and taluka test lab corona