चाळीसगावच्या अमित पाटेंना "गोल्डन लॉयन' पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

चाळीसगाव ः नासा गर्ल स्वीटी पाटे यांचे बंधू अमित पाटे यांच्या कंपनीला कान्स फेस्टिवलमध्ये "आर्टिफिशियल इंटेलिजन्स'वर आधारित स्पोर्ट टेक्‍नॉलॉजीसाठी मोबाईल श्रेणीकरीता तब्बल दोन "गोल्डन लॉयन'ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवताना त्यांनी गुगल, ऍपल, टोयोटा, ऑडी, वेरिझॉन, पी ऍन्ड जी, ऑरेन्ज, नायकी, केएफसी, कॅटबरी, द टाइम्स आदी नव्वद देशांच्या हजारो नामांकित कंपन्यांना मागे टाकून संपूर्ण जगाला अचंबित केले आणि लक्षावधी क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. 

अमित पाटे यांना मोबाईल टेक्‍नॉलॉजीसाठी "आर्टिफिशियल इंटेलिजन्स' श्रेणीत सादर केलेल्या "स्नॅप्टीविटी' या तंत्रासाठी सुवर्ण लायन पुरस्कार प्राप्त झाला. एकीकडे क्रीडा किंवा संगीत प्रेमींना स्मार्टफोन ऐवजी लाइव्ह गेममध्ये गुंतवून ठेवले जाते. उच्च गतीचे रोबोटिक कॅमेरे खेळपट्टीवर चालविण्याऐवजी क्रीडाप्रेमींवर फोकस करून जिवंत क्रीडा प्रकाराचा त्यांना अनुभव यावा,यासाठी "स्नॅप्टीविटी' हे तंत्र अमित पाटे यांच्या "स्नॅप्टीविटी'लि.या कंपनीने विकसित केले आहे. 

असे आहे तंत्रज्ञान 
अमित पाटे यांच्या नव्या तंत्रज्ञानामुळे क्रीडा किंवा संगीतप्रेमी आपल्या महत्त्वाच्या क्षणांना आठवणीत साठवून ठेवू शकतात. याशिवाय थेट क्रीडा किंवा संगीत कार्यक्रमांतही एकाचवेळी सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे त्यांच्या समुदायाचा एक भाग बनणे त्यांना शक्‍य होते. 

या स्टेडियमनी स्वीकारले तत्रज्ञान 
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, वेम्बली स्टेडियम, इतिहाद स्टेडियम (मॅनकेटी एफसी) आणि ऑरेंज वेलॉड्रोम (फ्रान्स) यासारख्या जगातील अग्रगण्य स्टेडियम्सने "स्नॅप्टीविटी' तंत्रज्ञान अंगिकारले आहे. अमित पाटे यांना नुकतेच नोकियाकडून "इनोव्हेशन चायलेंज'ने सन्मानित करून त्यांना "यंग अचिव्हर अवॉर्ड ऑफ द इयर' नुकताच प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या "स्नॅप्टीविटी' कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात ब्रिटिश सरकारची तसेच अनेक कॉम्प्युटर क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांची मान्यता प्राप्त केली आहे. अमित पाटे यांचा हा सर्व संशोधन प्रवास युवा पिढीला प्रोसाहित करणारा ठरला आहे. दोघा बहीणभावांनी सर्व भारतीयांसाठी गौरवाची परंपरा कायम ठेवली आहे. 

एक नव्हे तर दोन सुवर्ण कान्स लॉयन पुरस्कार मिळाल्याने आम्ही अत्यंत आंनदी आणि उत्साहित झालो आहोत. आमच्या रोमांचकारी संशोधन प्रवासातील हा एक महान मैलाचा दगड आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती करून ते मानव कल्याणासाठी सर्जनशील मार्गाने पोचवण्याचा आमचा हेतू सध्या झाला आहे. 
- अमित पाटे, संस्थापक, स्नॅप्टीविटी कंपनी, लंडन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon jalgaon amit pate golden