चाळीसगाव, पाचोरा, जामनेरला वादळी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

जळगाव : जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यात अवकाळी पावसाने आज सायंकाळनंतर हजेरी लावली. बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या गहू, ज्वारी, मका व हरभरा पिकांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही ठिकाणी रात्री उशिरा वादळी पाऊस झाल्यामुळे नुकसानीचा अंदाज येऊ शकला नाही. वादळानंतर ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. 

चाळीसगाव : शहरासह परिसरात आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस झाला. दिवसभर कडक ऊन होते. सायंकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर काही भागात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडला. आज शनिवारचा आठवडे बाजार असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांसह दुकानदारांची एकच धावपळ उडाली होती. काही वेळ वादळाचाही जोर वाढला होता. अशातच शहरात विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने अंधार निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय झाली. 

कजगाव (ता. भडगाव) : परिसरात आज रात्री आठच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे कजगावसह तांदूळवाडी, मळगाव, भोरटेक आदी भागातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या भागात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले होते. 
पाचोरा : पाचोऱ्यासह नगरदेवळा, निंभोरी परिसरात आज विजांच्या कडकडासह पाऊस झाला. यामुळे शेतकरी बांधवांची तारांबळ उडाली. गहू, बाजारी, ज्वारी, मका, हरभरा ही पिके कापणीवर आली असून ऐन तोंडी आलेला घास हातचा जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा अर्धा तास बंद झाला होता. 

जामनेर : शहरासह परिसरात आज रात्री दहाला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. अचानक आलेल्या या पावसाने धांदल उडाली. या पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon jamner avkadi rain to night