कर्तव्य बजावताना जोपासताय माणुसकीची भावना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

पोट भरण्यासाठी मध्यप्रदेशातील काही कुटूंबे औरंगबाद जिल्ह्यात कामाला आलेली होती.मात्र कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू झाला आणि त्यांच्या कामाचेही लॉकडाऊन झाले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : लॉकडाउन काळात अनेकांना दोन वेळचे जेवण मिळणे दिव्य झाले आहे.शेकडो, हजारो विस्थापित, निराधार कुटुंब आपल्या घराच्या ओढीने धाव घेत आहेत.अशा स्थलांतरीत, निराधारांच्या मदतीला खाकी वर्दीही आपले कर्तव्य पार पाडतांना माणुसकीची भावना जोपासत आहेत.

पोट भरण्यासाठी मध्यप्रदेशातील काही कुटूंबे औरंगबाद जिल्ह्यात कामाला आलेली होती.मात्र कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू झाला आणि त्यांच्या कामाचेही लॉकडाऊन झाले. हाताला काहीच काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. त्यामुळे नुकतेच औरंगाबादहुन 5 ते 6  परप्रांतीय कुटुंब आपला संसाराचा गाडा ओढत पायपीट करत चाळीसगाव येथुन  मध्यप्रदेशकडे जात होते. साधारणतः सकाळी 9 ची वेळ असावी. हे मजुर वाघळी गावाच्या पुढे हॉटेल माऊली जवळ एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. चालून चालून पायाचे त्राण संपले. पोटात अन्नाची कालवाकालव. त्याचवेळी चाळीसगावहुन रात्रपाळी करुन जळगाव येथील महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल नितिन ठाकुर व शैलेंद्र बाविस्कर जात होते.त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या मजुरांची अवस्था पाहीली आणि आपले वाहन थांबवून आपल्या स्वतःचा जेवणाचा डबा त्या परप्रांतिय युवकांना देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. 

सरपंचांनी केले कौतुक
वाघळी (ता.चाळीसगाव)येथील सरपंच विकास चौधरी यांनी या दातृत्व भावनेचा क्षण पाहिला या खाकी वर्दीतील दोन्ही वाहतूक पोलिसांचे कौतुक केले.यावेळी पत्रकार अजिज खाटीक, माऊली बँडचे संचालक विनायक महाजन  हे देखील उपस्थितीत होते. या लॉकडाऊन काळात गरंजुना मदत करणाऱ्या दोन्ही वर्दीतील दर्दी पोलिसांचे सर्वत्र कौतुक   होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon police on duty and help travaling people lunch