esakal | "कोरोनाचा'  चिकन खवय्यांनी घेतली धास्ती...पोल्ट्री व्यवसायावर ‘कोरोना’चे संकट 
sakal

बोलून बातमी शोधा

Poultry

गेल्या काही दिवसांत चिकनसह मटणाच्या विक्रीवर विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. चिकनची विक्री जवळपास ५० टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यातच चिकन खाल्ल्यावर ‘कोरोना’चा प्रसार होतो, अशा अफवा पसरत असल्याने मांसाहारी खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. 

"कोरोनाचा'  चिकन खवय्यांनी घेतली धास्ती...पोल्ट्री व्यवसायावर ‘कोरोना’चे संकट 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)ः ‘कोरोना’ व्हायरसच्या अफवेमुळे परिसरातील पोल्ट्री फार्मवर सध्या गंडांतर आले आहे. त्यामुळे गिरणा परिसरात बॉयलर चिकन शंभरच्या आत आले आहेत. ८० रुपये किलो दराने विक्री होत असतानाही कोणी चिकन घ्यायला तयार नाही. दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या भितीने अनेकांनी ‘नानव्हेज’ खाण्याची धास्ती घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चिकन विक्रेत्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. 


चीनसह विविध देशांत कोरोना विषाणूची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यातच समाजमाध्यमांवर या विषाणूचा प्रादुर्भाव मांसाहाराने होत असल्याचे संदेश फिरत असल्याने गेल्या काही दिवसांत चिकनसह मटणाच्या विक्रीवर विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. चिकनची विक्री जवळपास ५० टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यातच चिकन खाल्ल्यावर ‘कोरोना’चा प्रसार होतो, अशा अफवा पसरत असल्याने मांसाहारी खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. 

खवय्यांनी घेतली धास्ती 
चिकन खाल्ल्ल्याने ‘कोरोना’ची लागण होत असल्याची ‘पोस्ट’ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत असल्याने मांसाहार करण्यांमध्ये चांगलीच धास्ती पसरली आहे. त्यामुळे ‘चिकन’पासून दूर राहण्यावर खवय्ये भर देत आहेत. त्या तुलनेत बोकडाच्या मटणाला मात्र बऱ्यापैकी पसंती दिसून येत आहे. ‘कोरोनो’ व्हायरस येण्यापूर्वी बॉयरल कोंबडीचा दर प्रतिकिलो १६० रुपयांवर होता, तोच दर आता ८० चे १०० रुपयांवर आलेला आहे. ‘कोरोना’च्या अफवेमुळे खवय्ये चिकनकडे पाठ फिरवताना दिसून येत आहेत. चाळीसगाव शहरासह तालुक्यात चिकन विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्वांच्या व्यवसायावर सध्या विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अशातच बोकडाच्या मटनाचे भाव वाढले असले तरी बोकडाचे मटन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. बोकडाचे मटन ४५० रुपये किलो दराने विकले जात आहे. कॉकरेल २८० रुपये व गावरान कोंबडीचा ५०० रुपये किलोचा दर असला तरी खवय्यांची पसंती मात्र बोकडाच्या मटणाकडे दिसून येत आहे. 

पोल्ट्रीधारकांना फटका 
चिकनची मगणी कमालीची कमी झाल्याने चाळीसगाव तालुक्यासह जवळच्या भागातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पोल्ट्री धारकांच्या व्यवसायावर सध्या मंदीचे सावट पसरले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तसेच युवकांनी शेतीला जोडधंदा म्हणून लाखो रुपये खर्चून पोल्ट्री फार्म टाकले आहेत. मात्र, सध्या ‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्ट्रीच्या कोंबड्यांना मागणीच नसल्याने अनेक बेरोजगारांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. अगोदरच शेती निसर्गावर अवलंबून असल्याने त्यातून पाहिजे तसे उत्पन्न होत नाही. वाढती महागाई व चारा टंचाईमुळे गुरे पाळणेही कठीण जाते. त्यामुळे यावर पर्याय म्हणून ज्यांनी ज्यांनी कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे, असे सर्व जण सध्या कमालीचे अडचणीत आले आहेत. 


पोल्ट्री व्यवसायावर आले संकट 
गिरणा परिसरातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या तिन्ही तालुक्यातील ज्या ज्या बेरोजगार युवकांनी पोल्ट्रीचा व्यवसाय टाकला आहे, अशा सर्वांनाच ‘कोरोना’चा मोफा फटका बसला आहे. यातील अनेक बेरोजगारांनी या व्यवसायासाठी शेती गहाण ठेवून कर्ज घेतले असून काहींनी खासगी सावकारांमार्फत जास्तीच्या व्याजाने पेसै घेतले आहेत. सद्यःस्थितीत पोल्ट्रीतील कोंबड्यांना भावच नसल्याने या व्यवसायासाठी घेतलेले

कर्ज कसे फेडावे? 
याची चिंता पोल्ट्री व्यावसायिकांना लागली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना आधार द्यावा, अशी मागणी होत आहे. 

loading image
go to top