मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता - छत्रपती संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या सातपूर कार्यालयात त्यांनी संपादकीय विभागाशी संवाद साधला. 

नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या सातपूर कार्यालयात त्यांनी संपादकीय विभागाशी संवाद साधला. 

  मी स्वतः अंधश्रद्धा मानत नाही. त्यामुळे माझ्या गाडीला तुम्हाला कधीही लिंबू-मिरची दिसणार नाही. पण मी नास्तिक नाही. देवाची भक्ती करतो, असे सांगत असतानाच छत्रपती संभाजीराजे यांनी कोणताही विषय पुढे आला, की खोलवर जाऊन माहिती घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूरपरिस्थितीमध्ये आपत्तीग्रस्तांच्या मदतीला छत्रपती संभाजीराजे धावून गेलेत. पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली. पण त्याचे राजकारण केले नाही अथवा प्रसिद्धी मिळावी अशी भूमिका मदतीमागे ठेवली नाही. मात्र अशा पद्धतीने काम करणाऱ्यांचा मुलाहिजा न ठेवता त्यांनी कठोर शद्बांमध्ये नाराजी व्यक्त केली. संकटाच्या काळात माणुसकी अधोरेखित करण्याबद्दल सांगताना ते म्हणाले, की राज्याभिषेक समितीच्या नावाने शिवभक्तांनी 180 ट्रकभर साहित्य पाठवले. त्याचे संकलन मध्यवर्ती केंद्रात करण्यात आला. या केंद्रातून बाहेर पडणारी प्रत्येक वस्तू माणुसकीच्या नात्याने कुणाच्याही नावाविना होती. 

समन्वय यंत्रणा प्राधिकरणाची सूचना 
पूराचा तडाखा 1989, 2005 आणि आता कोल्हापूर, सांगलीला बसला. अलमट्टी धरण, अनाधिकृत बांधकाम, अतिवृष्टी अशी कारणे पूरपरिस्थितीमागे आहेत. आताच्या पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण परदेशी यांच्यावर सोपवली होती. पूरपरिस्थितीने सातत्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी समन्वय यंत्रणा प्राधिकरणाची स्थापना करण्याची सूचना श्री. परदेशी यांना आपण केली आहे. या प्राधिकरणातंर्गत सगळे विभाग एका छताखाली असतील. त्याचवेळी या प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाईल, अशी व्यवस्था करावी लागणार आहे.

  श्री. परदेशी यांनी टोकिओमध्ये अधिकचे पाणी पाईपलाईनद्वारे इतर भागात नेण्याच्या प्रयोगाची माहिती चर्चेवेळी दिली. तसेच आता पूरपरिस्थितीनंतरच्या उपाययोजनांसाठी सहा हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्याचे नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून करावे लागेल, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. मुळचा मराठी मातीतील पण पानिपतमध्ये स्थायिक झालेल्या रोड मराठा समाजाच्या भेटीसाठी जात असतो. पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाल भागात दौरा करतो. या समाजाला शिवजयंतीला निमंत्रित केले जाते, अशीही माहिती त्यांनी दिली. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी स्वागत केले. छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, महापालिका स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे, ऍड्‌. शिवाजी सहाणे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. 

नाशिकच्या पर्यटनाला देणार चालना 
कोल्हापूरबद्दल माझ्या मनात जिव्हाळा आहे. त्याचवेळी मी नाशिकवर प्रेम करतो. कारण नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक किल्ले आहेत. सायकलिंग, हिरवीकंच निसर्गराजी, ट्रेकिंग, पर्वतराजी, तीर्थक्षेत्र हे नाशिकचे वैभव आहे. त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे सांगून छत्रपती संभाजीराजे म्हणाले, की जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी माझे बोलणे झाले असून नाशिकच्या पर्यटन विकासाचा "मास्टर प्लॅन' तयार करण्याबाबत त्यांना सूचवले आहे. दिल्लीत केंद्र सरकारकडून त्यास मान्यता आणण्याचा प्रयत्न केला जाईल. 

"मराठा' उमेदवारांच्या अडवणुकीची दखल 
स्टाफ सिलेक्‍शन भरतीत "आरपीएफ'च्या प्रशिक्षण केंद्रात शारीरिक चाचणीत अर्धसैनिक बलाच्या परप्रांतीय अधिकाऱ्यांकडून मराठा उमेदवारांची अडवणूक होत असल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रकरणाची अधिक माहिती घेतली. तसेच याप्रकरणी अर्धसैनिक बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
.... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news coffe with sakal