esakal | राज्यातील 800 रेल्वे प्रशिक्षणार्थींची केरळमधून सुटकेसाठी हाक 
sakal

बोलून बातमी शोधा

student

जळगाव जिल्ह्यातील नवीदाभाडी (ता. जामनेर) येथील युवक सुभाष गंगाराम कोळी यांनी केरळहून थेट "सकाळ'कार्यालयात फोन करून कैफियत मांडली.

राज्यातील 800 रेल्वे प्रशिक्षणार्थींची केरळमधून सुटकेसाठी हाक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ऍप्रेंटिसशिपसाठी महाराष्ट्रातून गेलेले तब्बल 800 विद्यार्थी केरळात अडकले आहेत. त्यांचा प्रशिक्षण कालावधी संपून वीस दिवस झाल्याने स्टायपेंडही बंद झाले असल्याने त्यांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. राज्य शासनाने कोटाच्या धर्तीवर केरळातूनही ऍप्रेंटिसधारकांची सुटका करावी, अशी आर्त हाक या विद्यार्थ्यांनी दिली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील नवीदाभाडी (ता. जामनेर) येथील युवक सुभाष गंगाराम कोळी यांनी केरळहून थेट "सकाळ'कार्यालयात फोन करून त्या ठिकाणची कैफियत मांडली. तो म्हणाला, की रेल्वेतर्फे ऍप्रेंटिस म्हणून आयटीआय झालेले आम्ही महाराष्ट्रातील तब्बल 800 युवक केरळ येथे 12 मे 2019ला प्रशिक्षणार्थी म्हणून आलो. त्यात जळगाव जिल्ह्यातील जास्त युवक आहेत. रेल्वेतर्फे आम्हाला स्टायपेंड देण्यात येत होते, त्यात आम्ही आमचा खर्च भागवीत होतो. मात्र 11 एप्रिलला आमचा प्रशिक्षण कालावधी संपला, मात्र "लॉकडाउन'मुळे आम्हाला परत महाराष्ट्रात येता आलेले नाही. आता रेल्वेने स्टायपेंडही बंद केले आहे. त्यामुळे आमच्या जेवणाचेही हाल होत आहे. "लॉकडाउन'असल्यामुळे घरून पैसे मागविणेही कठीण आहे. 

प्रशिक्षण कालावधी संपल्याने रेल्वेचे अधिकारीही या तरुणांची दखल घेण्यास तयार नाही. या शिवाय भाषेची अडचण असल्यामुळे त्यांना कोणाशीही संवादही साधता येत नाही. या परिस्थितीतून सुटका करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. केरळच्या त्रिवेंद्रम भागातील कायमकोलम जंक्‍शन स्थानकात ते अडकले असून, त्यांचा मोबाईल क्रमांक 08830917909 असा त्याने दिला आहे. प्रशिक्षणार्थींमध्ये जळगाव जिल्ह्यातील अधिक तरुणांचा समावेश असल्याने पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पावले उचलावीत अशी आर्त विनवणी त्यांनी केली आहे. 

loading image