
काल्लेखेतपाडा येथे १२ पाड्यावरची १४० मुले दररोज सरासरी ४ किलोमीटर चालत शाळेत येतात. आज हीच शाळा शैक्षणिक गुणवत्तेचा जोरावर जागतिक शाळामध्ये संवादासाठी सहभागी झाली आहे.
धडगाव ः नुकत्याच झालेल्या सहा खंडातील हजारो शाळांमधून जगातील शंभर शाळांमध्ये महाराष्ट्रातील काल्लेखेत (ता. धडगाव) जिल्हा परिषद शाळेला सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. उद्याचे ‘भविष्य इथे किलबिलते’ हे ब्रीदवाक्य घेऊन २००१ मध्ये तेगा पावरा यांच्या वस्तीशाळेचे २००९ मध्ये प्राथमिक शाळेत रूपांतर झाले. आणि या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनमान उंचावले. आज हीच शाळा शैक्षणिक गुणवत्तेचा जोरावर जागतिक शाळामध्ये संवादासाठी सहभागी झाली आहे.
या शाळेत सुरवातील शिक्षक रुपेशकुमार नागलगावे यांना मुख्याध्यापक म्हणून संधी मिळाली. फक्त १४ विद्यार्थीवरून आज शाळेत विद्यार्थी पटसंख्या १४० झाली आहे. आज शाळेचे नाव जागतिक पातळीवर पोचल्यामुळे गाव स्तरावर काल्लेखेत शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काल्लेखेतपाडा येथे १२ पाड्यावरची १४० मुले दररोज सरासरी ४ किलोमीटर चालत शाळेत येतात. आठ ऑक्टोबरला जागतिक शिक्षण संवाद सत्र म्हणजे ‘ग्लोबल एज्युकेशन वीक’च्या कार्यक्रमात जगातल्या १०० शाळांमध्ये या शाळेला चर्चासत्रात भाग घेण्याची संधी मिळाली आहे.
शाळेच्या सादरीकरण कार्यक्रमात स्पीकर म्हणून मुख्याध्यापक रुपेश नागलगावे, लक्ष्मीपुत्र उप्पीन (सहशिक्षक), तेगा पावरा, चेतन पावरा, मोगी पावरा, मनीषा पावरा, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सहभाग घेतला. ग्यानप्रकाश फाउंडेशनच्या पल्लवी यांनी सूत्रसंचालन व इंग्रजी भाषांतर करून जागतिक प्रेक्षकांसाठी सेतू म्हणून काम केले.
संपादन- भूषण श्रीखंडे