राईनपाड्यात क्रूरतेची परिसीमा; हत्याकांडाने सारेच सुन्न

विनायक पाटील
सोमवार, 2 जुलै 2018

आमळी ः राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे आज दुपारी मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने अत्यंत क्रूरतेने पाच जणांची दगडांनी ठेचून हत्या केली. क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या या हत्याकांडाने सारा जिल्हा पुन्हा एकदा सुन्न झाला. "सोशल मीडिया'वरून याबाबत फिरत असलेल्या क्‍लीपमधून झालेल्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मूळचे नाथपंथीय भिक्षेकरी असलेल्या या समाजातील भटकंती करणाऱ्या या लोकांचा आणि राईनपाड्याच्या ग्रामस्थांचा काहीही संबंध नसताना एवढे टोकाचे पाऊल उचलले गेल्यामागे निव्वळ अफवांच असल्याचे मानले जात आहे. 

राईनपाड्याचा आज आठवडे बाजार होता. एका मुलीने "धऱ्या वनात' असे सांगितल्याने प्रारंभी काकरदे येथे काहींना मुले पळविणारे आले आहेत असा संशय आला. त्यांनी या पाचही जणांना राईनपाडा बसथांब्याजवळ आणले. तेथे आठ ते दहा तरुणांसोबत जमाव वाढत गेला. त्यानंतर पाचही जणांना ग्रामपंचायत कार्यालयात नेले. तेथे दरवाजा, खिडक्‍या लावून त्यांना मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण केली. त्यानंतर मोठा जमाव जमला. जमावाने कार्यालयाच्या खिडक्‍या तोडून आत मिळेल त्या साहित्याने मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी पाचही जण मारेकऱ्यांना विनवणी करीत होते. "आम्ही साधे भिक्षेकरी आहोत हो', अशी हात जोडून विनंती करीत होते. मात्र, जमावातील कुणीही त्यांचे ऐकले नाही. सळई, टॉमी, खुर्च्या, विटा, दगड आदींनी सपासप वार होत राहिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

चेहरेही झाले विदारक 
मारहाणीत पाचही जणांच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्यांचे चेहरेही ओळख पटविण्याच्या पलीकडे गेले होते. जमावाला नियंत्रित करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, जमावाकडून पोलिसांनाही मारहाण झाली. त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. सहाय्यक उपनिरीक्षक आर. के. रणधीर, हवालदार विश्राम पवार, शरद चौरे जखमी झाले. धुळ्याहून कमांडो पथकालाही पाचारण करण्यात आले. जिल्हाभरातून मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला. जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, धुळे तालुका पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटना गंभीर, शांतता राखा 
सायंकाळी सव्वासहाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी पाहणी केली. राईनपाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयाची सायंकाळी सव्वासहाला पाहणी केली. त्यानंतर जेथे घटना घडली तेथे पंधरा मिनिटे पाहणी केली. तेथून ते बसस्थानकाकडे आले. तेथून अर्धा किलोमीटरवरील काकरदे गावात पाहणी केली. घटना अत्यंत गंभीर असल्याचे डॉ. दोरजे यांनी सांगितले. 

मारेकरी दारूच्या नशेत 
पोलिसांच्या धरपकडीनंतर गावात केवळ महिला व लहान मुले दिसत होती. सर्व ग्रामस्थ जंगलात फरार झाले. काही घरांना कुलूप लावले होते. संशयित 18 ते 20 जणांना सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मारहाण करणारे बहुतांश दारूच्या नशेत होते. ग्रामपंचायत कार्यालयातील संगणकासह अन्य साहित्याचीही मोडतोड करून तुकडे केले. तसेच कार्यालयात विटा, दगडांचा खच पडला होता. घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलिस बंदोबस्त तैनात होता. रात्री उशिरापर्यंत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दोरजे यांच्यासह पोलिस अधिकारी तळ ठोकून होते. 
 
Web Title: marathi news dhule aamli rainpada hatyakand