esakal | धुळ्यात ‘संचारबंदी’ची लागली वाट; ‘तू तू, मैं मैं’ आणि खोळंबा !
sakal

बोलून बातमी शोधा

police

धुळ्यात ‘संचारबंदी’ची लागली वाट; ‘तू तू, मैं मैं’ आणि खोळंबा !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने १ मेपर्यंत संचारबंदी लागू करत अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली. तसेच स्थानिक यंत्रणांनी या आदेशाची कठोर अंमलबजावणी करावी, असा आदेश दिला. मात्र, त्याचे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्रास उल्लंघन होत आहे. धुळे शहरात तर संचारबंदीची पुरती वाट लागल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल, असा प्रश्‍न सुज्ञांनी उपस्थित केला.

रुग्णालयात दाखल रुग्णांचे नातेवाईक ये- जा करत असतील तर त्यास कुणाचा विरोध नाही. मात्र, या स्थितीचा गैरफायदा घेत अनेक रिकामटेकडे, विनाकारण कामाचा बाऊ करणारे शहरात संचारबंदीचे उल्लंघन करत हिंडताना दिसत आहेत. संचारबंदीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी पोलिस, महापालिकेचा कुठलाही धाक दिसून न आल्याने आता तर आग्रा रोड, नेहरू चौक, इतर भागात सकाळपासून पूर्ववत गर्दी, खरेदीसाठी रेलचेल दिसून येत आहे. अनेक धुळेकरांना कोरोनाचा धाकच उरलेला नाही, असे गंभीर चित्र दिसते.

एकिकडे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिरसाठी मारामार सुरू असताना निर्धास्तपणे कायदा, नियमांचे उल्लंघन करत हिंडणारे आपल्या जबाबदारीचे भान विसरल्याने दुसऱ्याचा जीव धोक्यात घालत असल्याची भीती व्यक्त होत आहे. अशांना कायद्याचा कठोर धाक दाखविल्याशिवाय स्थिती नियंत्रित राहणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. वर्षभरापासून पोलिस, महसूल, महापालिका, आरोग्य यंत्रणा कोविडशी मुकाबला करत आहेत. अहोरात्र जनसेवा करत आहेत. किमान त्यांचा विचार करून रिकामटेकड्यांनी संचारबंदीचे पालन करणे अपेक्षित आहे. मात्र, पोलिस रस्त्यावर आल्याशिवाय आम्ही कुणालाही जुमानणार नाही, असा एक वर्ग आणि पोलिसांनी कायद्याचा धाक निर्माण केल्याशिवाय संचारबंदी यशस्वी ठरू शकणार नाही, असे मानणारा एक वर्ग, अशा ‘तू तू, मैं मैं’मध्ये येथे संचारबंदीची पुरती वाट लागल्याचे मानले जाते.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image