esakal | धुळ्यात सार्वजनिक वापरातील सर्व पूल बंद !

बोलून बातमी शोधा

null
धुळ्यात सार्वजनिक वापरातील सर्व पूल बंद !
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवाधुळे : विविध उपाययोजना राबवूही कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने राज्य सरकारने सकाळी सात ते अकरापर्यंत निर्बंध शिथिल करत नंतर संचारबंदीसह कठोर लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मोठा पूल वगळता इतर सर्व पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (ता. २३) घेतला. यात केवळ अत्यावश्‍यक सेवा व संबंधित कर्मचाऱ्यांना तैनात पोलिसांच्या संमतीनेच ये- जा करता येईल.

वारंवार आवाहन करूनही असंख्य नागरिक निरनिराळ्या नियमांचा भंग करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याचा वैद्यकीय व इतर सर्व शासकीय यंत्रणांवर अकारण ताण पडत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे शहरातील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी घेतला आहे.

धुळ्यात कोणते पूल बंद?
धुळे शहरातील गणपती पूल, श्री कालिकामाता मंदिराजवळील पूल, लहान पूल व मोठा पूल अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक वापरासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यादव यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले, की कोरोना विषाणूमुळे उद्‍भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यात राज्यात गेल्या १३ मार्चपासून साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी सुरू आहे. कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार धुळे जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये २२ एप्रिल ते १ मेस सकाळी सातपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.देवपूर व उर्वरित धुळ्याला चाप
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शहरातील विनाकारण वर्दळ करणारी वाहने, तसेच देवपूर भागातून उर्वरित धुळे शहरात येणारी, तसेच देवपूर भागात जाणाऱ्या वाहतुकीस निर्बंध करता यावा यासाठी गणपती पूल, लहान पूल व मोठा पूल तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवावा, अशी विनंती केली आहे. त्यानुसार धुळे शहर व देवपूर भागाला वाहतुकीद्वारे जोडण्यात येणारे सर्व पूल सार्वजनिक वाहतूक आणि विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंधित असतील.

फक्त यांना मिळेल परवानगी
बंद पुलांवरून केवळ वैद्यकीय सेवा देणारी वाहने, कर्मचारी व अत्यावश्यक सेवेसंबंधित वाहतूक सुरू ठेवली जाईल. महापालिका आणि पोलिस विभागाने या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी दिले. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटनेला तरतुदीनुसार फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

शहरात ३०० पोलिसांची करडी नजर
जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित म्हणाले, की अत्यावश्‍यक सेवेसंबंधी वाहने, कर्मचारी वगळता बंद पुलांवर अकारण हिंडणाऱ्यांना तैनात पोलिस अधिकारी, कर्मचारी अटकाव करतील. बंद पुलांवर तैनात पोलिस प्रत्येकाची तपासणी करतील. कुणीही खोटे कारण सांगितल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल. देवपूरमधील, तसेच उर्वरित धुळे शहरातील नागरिकांनी आपापल्या भागात निर्धारित वेळेत आवश्‍यक खरेदी करावी. शासकीय आदेशाचा भंग करू नये. अहोरात्र सेवेत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांशी नाहक वाद घालू नये. पोलिस व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. शहरात अडीचशे पोलिस आणि मदतीला ५० होमगार्ड, असे तीनशे कर्मचारी स्थितीवर करडी नजर ठेवतील.

संपादन- भूषण श्रीखंडे