esakal | Video ट्रॅक्‍टरभर काकडी गुरांसमोर; 35 लाखाचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

cucumber

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुरु असलेल्या 'लॉकडाऊन'मुळे भाजी मंडई व बाजारपेठा मर्यादित कालावधीसाठी खुल्या केल्या जातात. तसेच गिऱ्हाईकही कमी संख्येने येत असल्याने बाजारातून काकडीची मागणी बंद झाली आहे. मार्केट बंद झाल्याने सुरतला दहा टन काकडी खड्ड्यात टाकून द्यावी लागली होती; असे विनायक अकलाडे यांनी सांगितले. 

Video ट्रॅक्‍टरभर काकडी गुरांसमोर; 35 लाखाचे नुकसान

sakal_logo
By
भिलाजी जिरे

चिकसे : कोरोना व्हायरसमुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असल्याने मोठे उत्पन्न घेणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यातच साक्री तालुक्‍यातील देगाव येथील काकडी उत्पादक शेतकरी विनायक अकलाडे यांना "लॉकडाऊन'मुळे ट्रॅक्‍टरभर काकडी रस्त्यावर टाकून द्यावी लागली. यामुळे तब्बल 35 ते 40 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. 

देगाव येथील विनायक अकलाडे यांनी सहा एकरावरील शेडनेट हाऊसमध्ये निर्यातक्षम दर्जाची काकडी लागवड केली आहे. सध्या दररोज आठ ते दहा टन काकडी तोडली जात आहे. मात्र कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुरु असलेल्या 'लॉकडाऊन'मुळे भाजी मंडई व बाजारपेठा मर्यादित कालावधीसाठी खुल्या केल्या जातात. तसेच गिऱ्हाईकही कमी संख्येने येत असल्याने बाजारातून काकडीची मागणी बंद झाली आहे. मार्केट बंद झाल्याने सुरतला दहा टन काकडी खड्ड्यात टाकून द्यावी लागली होती; असे विनायक अकलाडे यांनी सांगितले. 

मागणीच नसल्याने पर्याय संपला 
लॉकडाऊन पूर्वी आठवडाभरात दहा ते तेरा रूपये प्रतीकिलो दराने राजस्थानचे व्यापाऱ्यांनी निर्यातीसाठी साधारणतः तीन ते साडेतीन लाख रूपयांची काकडी खरेदी करून नेली होती. मात्र त्यानंतर दररोज साधारणत: दहा टन काकडी तोडली जात आहे. मात्र तिला मागणी नसल्याने तोडून शेताबाहेर फेकावी लागत आहे. रोजच तीन ते चार ट्रॅक्‍टर फेकलेली काकडी काठेवाडी बांधव व इतर शेतकरी गुरांसाठी चारा म्हणून वापरत आहेत. 

तोडणीसाठी लागतोय अजूनही खर्च 
प्रती एकर 50 ते 60 टन उत्पन्न देणारी काकडी फेकण्याची वेळ आल्याने 35 ते 40 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. 3 लाख रूपये रोप, 1 लाखाचे शेणखत, 75 हजारांचा मल्चिंग कागद, मजुरी, किटकनाशके, जैविक खते आदी एकूण 10 ते 12 लाख रुपये खर्च झाल्याचे व अजूनही दररोज सात ते आठ हजार रुपये खर्च सुरू असल्याचे विनायक अकलाडे यांचा मुलगा सुमित अकलाडे यांनी सांगितले. लॉकडाऊनची अशीच स्थिती राहिली तर तीन आठवड्यात सुरू होणारे टरबुज व पपई हे फळपिकेही मातीमोल होतील की काय अशी शंका सुमित अकलाडे यांनी व्यक्त केली. भाजीपाला उत्पादक व इतर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने योग्य ते नियोजन करून शेतकरी अडचणीत येणार नाही याबद्दल त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी अकलाडे यांनी केली.