मास्कनिर्मितीतून साडेसात लाखांवर उलाढाल 

पी. एन. पाटील
शनिवार, 23 मे 2020

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर महिला स्वयंसहाय्यता गटांनी पुढे येत मास्क निर्मितीसोबत भाजीपाला, फळे व धान्य विक्री करून चरितार्थाचा वेगळा मार्ग निवडून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. जिल्हा, तालुकास्तरावर योग्य मार्गदर्शन करीत मास्कनिर्मिती, त्यांना निर्जंतुकीकरण करणे याबाबत माहिती दिली.

नवलनगर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान कक्षातर्फे जिल्ह्यातील 127 महिला स्वयंसहाय्यता समूहांमार्फत 502 महिलांनी आजअखेर 64 हजार 557 मास्क तयार केले. स्थानिक व विविध विभागांना सुमारे 53 हजार मास्कची विक्रीही केली. त्यातून सात लाख 53 हजार 948 रुपयांची उलाढाल झाली. "कोरोना' संकटकाळात महिलांनाही रोजगारप्राप्त झाला आहे. 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर महिला स्वयंसहाय्यता गटांनी पुढे येत मास्क निर्मितीसोबत भाजीपाला, फळे व धान्य विक्री करून चरितार्थाचा वेगळा मार्ग निवडून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. जिल्हा, तालुकास्तरावर योग्य मार्गदर्शन करीत मास्कनिर्मिती, त्यांना निर्जंतुकीकरण करणे याबाबत माहिती दिली. उमेद अभियानातर्फे महिलांना वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात आठ हजार 992 स्वयंसहाय्यता समूह कार्यरत आहेत. 

सिंगल ते ट्रिपल लेयर मास्क 
मास्कच्या लेयरनुसार 12 ते 25 रुपयांपर्यंत प्रतिमास्क विक्रीला आहेत. डबल लेयरची किंमत पंधरा रुपये आहे. आतापर्यत 53 हजार मास्कची विक्री झाली. मास्कनिर्मितीचे काम सुरू आहे. आरोग्यविषयक सूचनांचे पालन करीत जनजागृती केली. "कोरोना'चा सामना करण्यासाठी "मास्क'चा वापर वाढून मागणीही वाढेल, या हेतूने वैयक्तिक व समूहाने महिलांनी मास्कनिर्मितीचे काम हाती घेतले, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठाही योग्य दरात ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., प्रकल्प संचालक बी मोहन, जिल्हा अभियान व्यवस्थापक त्रिवेणी बोंडे, जिल्हा व्यवस्थापक जितेंद्र चौधरी, तालुका गटविकास अधिकारी आदींनी महिलांना मार्गदर्शनासह प्रोत्साहन दिले. 

भाजीपाला, धान्याचीही विक्री 
जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहाने "कोरोना' संकटकाळात नाउमेद न होता, आतापर्यंत 64 हजार 557 मास्कची निर्मिती केली. तसेच 212 समूह संघामार्फत 42 हजार 353 क्विंटल भाजीपाला, फळे व धान्याची विक्रीतून 24 लाख 15 हजार 125 रुपये नफा मिळवत उल्लेखनीय उलाढाल केली. तसेच "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी स्वतःची काळजी घेत जनजागृतीही केली. शासनाच्या नियमांचे पालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona virus lockdown days mask production