esakal | नागरिकांना समजावण्यासाठी धुळ्यात यंत्रणेची कसरत 
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांना समजावण्यासाठी धुळ्यात यंत्रणेची कसरत 

मागील काही दिवसांत प्रशासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले, म्हणून काही दुकानदारांवर पथकाने दंडात्मक कारवाईही केली होती. 

नागरिकांना समजावण्यासाठी धुळ्यात यंत्रणेची कसरत 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे: मास्क न लावता फिरणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्यांना मास्क लावण्याचे आवाहन करण्याची कसरत महापालिका व पोलिसांना करावी लागत आहे. मंगळवारी (ता. १७) पथकाने शहरातील पारोळा रोडवर आवाहन केले. 


दरम्यान, रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटलेले एक शेडही पथकाने हटविले.दिवाळीनिमित्त बाजारात वाढलेल्या गर्दीतून कोरोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून नागरिक, व्यावसायिकांना दक्षता, उपाययोजनांबाबत आवाहनासह कारवाई करण्यात येत आहे. मागील काही दिवसांत प्रशासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले, म्हणून काही दुकानदारांवर पथकाने दंडात्मक कारवाईही केली होती. 
दरम्यान, पथकाने मंगळवारीही शहरातील पारोळा रोड व परिसरात नागरिक तसेच दुकानदार, व्यावसायिकांनाही मास्क लावण्याचे आवाहन केले. 

अनेक जण विनामास्क 
शहरात, बाजारात मंगळवारी अनेक नागरिक मास्क न लावताच फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यात महिलांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसले. अनेक जण तर आपल्या लहान मुलांनाही मास्क लावत नसल्याचे दिसून येते. बाजारात महापालिका व पोलिसांचे पथक पाहिल्यानंतर अनेक जणांचा तोंडावर मास्क अथवा रुमाल येतो. पथकापासून दूर गेल्यावर पुन्हा तो मास्क, रुमाल काढला जातो. नागरिकांचे असे वागणे यंत्रणेसाठीही डोकेदुखी ठरत आहे. 

अतिक्रमित शेड काढले 
महापालिका व पोलिसांच्या पथकाने पारोळा रोडवर अनधिकृतपणे पत्र्याची शेड उभारून गरम कपड्यांचे दुकान थाटले होते. ते दुकान पथकाने हटविले. शहरात अनेक ठिकाणी अशी दुकाने सध्या लागली आहेत. महापालिकेसमोर काही दिवसांपूर्वी पथकाने अशी दुकाने हटविली होती. मात्र, ती पुन्हा ‘जैसे थे’ थाटलेली पाहायला मिळतात. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे