esakal | घरकुल घोटाळा : न्यायाधीशांचा 563 पानी निकाल 
sakal

बोलून बातमी शोधा

घरकुल घोटाळा : न्यायाधीशांचा 563 पानी निकाल 

घरकुल घोटाळा : न्यायाधीशांचा 563 पानी निकाल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे ः जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती डॉ. सृष्टी निळकंठ यांनी शनिवारी 563 पानांचा निकाल दिला. यात संदर्भ 37 कागदांसह त्यांनी प्रत्येक आरोपीला 600 पानांचे निकालपत्र दिले. त्यांनी एकूण 49 आरोपींना मिळून असा एकूण 29 हजार 400 पानांचा निकाल वाटप केला. त्यासाठी त्या तब्बल अखंड 23 तास कामात गर्क होत्या. त्यामुळे जिल्हा विशेष न्यायालय देशाच्या इतिहासात प्रथमच इतका कालावधीसाठी खुले व कामकाजात गुंतलेले होते. 
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जिल्हा विशेष न्यायालयात शनिवारी (ता. 31) निकालासंदर्भात कामकाज झाले. न्या. सृष्टी निळकंठ यांनी जिल्हा न्यायालय स्तरावर सर्वाधिक शंभर कोटी रुपये दंडाची माजी मंत्री सुरेशदादा जैन, तसेच प्रत्येकी चाळीस कोटी रुपये दंडाची राजा मयूर, प्रदीप रायसोनी यांना शिक्षा सुनावली. त्यांना सात वर्षे कारावास सुनावला. यातून देशाच्या इतिहासात हा ऐतिहासिकच निकाल मानला गेला. 

न्यायाधीश 23 तास गर्क 
न्या. सृष्टी निळकंठ या शनिवारी सकाळी नऊला न्यायालयात उपस्थित झाल्या. दुपारी बाराला त्यांनी निकालासंदर्भात कामकाज सुरू केले. नंतर दुपारी सव्वाला त्यांनी सर्व 49 आरोपींना ताब्यात घेण्याची सूचना पोलिसांना दिली. सायंकाळी पाचला त्यांनी शिक्षा सुनावली. नंतर रविवारी (ता. 1) सकाळी आठपर्यंत त्या अखंडपणे न्यायालयासह दालनात ठाण मांडून होत्या. त्यांनी या 23 तासांत प्रत्येक आरोपीला 563 पानांच्या निकालासह एकूण सहाशे पानांचे निकालपत्र दिले. तसेच पोलिसांसह तुरुंगाधिकाऱ्यांना वॉरंटची आरोपीनिहाय कागदपत्रे दिली. वैद्यकीय उपचारांबाबत आरोपींकडून दाखल झालेल्या अर्जांवर निकाल देत त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला. आरोपींच्या वकिलांनी विविध प्रकारचे केलेले अर्ज दाखल करून घेतले. 

पोलिसांचेही जागरण 
याकामी पोलिसांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांची मदत त्यांनी घेतली. सर्व अहोरात्र जागे होते. "एलसीबी'चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, शहराचे निरीक्षक गणेश चौधरी, देवपूरचे निरीक्षक सानप, आझादनगरचे निरीक्षक आहेर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, कमांडो, महिला कर्मचारी, असे दोनशेहून अधिक पोलिस बळ सकाळी आठपर्यंत न्यायालयात होते. वकीलही उपस्थित होते. 

कामकाजाचा देशात इतिहास 
निकालपत्रावर न्यायाधीशांची स्वाक्षरी व आरोपींनी ते स्वाक्षरीनिशी स्वीकारल्यानंतर पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी पहिल्या दहा आरोपींना अटक करून पोलिस वाहनाने वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. यात माजी मंत्री जैन, राजा मयूर, जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी, अशोक सपकाळ आदींचा समावेश होता. नंतर पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी पुढील दहा, नंतर सकाळी साडेसातपर्यंत असे एकूण 49 आरोपी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. ही प्रक्रिया आटोपल्यावर सकाळी आठला न्या. सृष्टी निळकंठ या निवासस्थानाकडे रवाना झाल्या. त्यांनी निकालपत्रासंबंधी जिकरीचे काम 23 तासांत पूर्ण केले. देशाच्या इतिहासात प्रथमच इतका कालावधी न्यायालयीन कामकाज सुरू राहिल्याचे सांगण्यात आले. 

न्यायालयात काय घडले? 
न्यायालयाचे कामकाज अखंड 23 तास सुरू असताना 49 आरोपींना जेवणाच्या डब्यांसाठी परवानगी मिळाली. आरोपींनी कामकाज होत असलेल्या न्यायालयात खुर्चीवर झोप घेतली. काही आरोपींनी सरळ जमिनीवरच झोपणे पसंत केले. काही महिला आरोपी बेंचवर झोपल्या. बाहेर पोलिस पहारा देत होते. प्रसाधनगृहात जाताना संबंधित आरोपीबरोबर महिला किंवा पुरुष पोलिस कर्मचारी असायचा. पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी निकालपत्र वाटपास सुरवात झाल्यावर सर्व आरोपी जागेवर स्तब्ध बसून होते. 
 

loading image
go to top