
व्यवसायात आई कमलबाई माळी यांची साथ अतिशय मोलाची आहे. मामांनी दिलेले मार्गदर्शन आणि मेहुण्यांनी पाठीवर ठेवलेला हात लढण्याची प्रेरणा देत आहे.
- योगेश माळी, कापडणे
कापडणे : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे तीन महिने कडकडीत बंद राहिल्याने लेअर पक्षीपालन पूर्णतः संकटात सापडले. योगेश माळी यांचे या तीन महिन्यांत पन्नास लाखांचे नुकसान झाले. दररोज सरासरी आठ हजार अंड्यांचे उत्पादन खपविणे बंद झाले. ८० टक्के उत्पादकांनी पक्षी फुकटात विकले, खड्ड्यांत पुरले. मात्र, माळी यांनी नुकसानीची झळ सोसत साडेआठ हजार पक्ष्यांचे पालनच केले अन् गेल्या महिन्यापासून अंड्यांचे दर वाढल्याने हा व्यवसाय तेजीत आला आहे.
लॉकडाऊनची भरपाई निघेल
योगेश माळी यांनी लॉकडाऊनच्या काळात दररोज पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान सहन केले. साडेआठ हजार पक्षी जगविले. आता अंड्याचे घाऊक दरही प्रतिअंडी पाच रुपयांपर्यंत पोहोचले. कोरोनाबाधित आणि सुरक्षतेचा उपाय म्हणून अंडी सेवनाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने अंड्यांचे दर आणखी वाढतील, असे माळी यांनी सांगितले.
...नाहीतर नोकरीच केली असती
योगेश माळींकडे साडेआठ हजार पक्षी आहेत. सरासरी दररोज आठ हजार अंडी उत्पादीत होतात. दररोजची सरासरी बत्तीस हजारांची उलाढाल आहे. वार्षिक दीड कोटीची उलाढाल होते. खर्च काढून बऱ्यायापैकी नफा आहे. एमएसडब्ल्यू केल्यानंतर प्रतिमाह सहा हजारांची नोकरी मिळाली; पण माळी यांचे मामा पशुवैद्यकीय डॉ. लक्ष्मण किसन तिसगे यांनी मार्गदर्शन केले अन् साडेतीन वर्षांत मोठा उद्योग उभा राहिला. दहा जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे माळी युवा उद्योजक झाले. यासाठी बँकेची साथही मोलाची आहे.
संपादन ः राजेश सोनवणे