Loksabha 2019 : भाजपमधील अंतर्गत बंडाळीने मतविभागणी अटळ 

Loksabha 2019 : भाजपमधील अंतर्गत बंडाळीने मतविभागणी अटळ 

धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे. गेल्या वेळी डॉ. भामरे यांना तब्बल 69 हजाराचे मताधिक्‍क्‍य मिळाले होते. दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असल्याने समाजातील व भाजपतील अंतर्गंत बंडाळीने मतविभागणी अटळ आहे. यातच युवानेते अद्वय हिरे यांची साथ या वेळी आमदार पाटील यांना असल्याने गेल्या वेळची आघाडी राखण्याचे मोठे आव्हान युतीपुढे आहे. 

मालेगाव बाह्य विधानसभेत शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी हॅट्रीक केली आहे. तालुक्‍यात श्री. भुसे व अद्वय हिरे यांची ताकद मोठी आहे. गेल्या निवडणुकीत दोन्ही नेते डॉ. भामरे यांच्या पाठिशी असल्याने डॉ. भामरे यांना मोठे मताधिक्‍य मिळाले. मालेगाव मध्यमधून कॉंग्रेस उमेदवार अमरिशभाई पटेल यांना मिळालेले लाखावरचे मतधिक्‍य कमी करण्यात मालेगाव बाह्यने मोलाचा वाटा उचलला. यातूनच डॉ. भामरेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला. पाच वर्षात राजकीय समिकरणे बदलली. तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह विविध निवडणुका भाजप- शिवसेने स्वतंत्र लढल्या. भुसे व हिरे गटातील राजकीय संघर्ष चार वर्षे रंगला. बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत हिरे यांनी शिवसेनेला कडवी लढत देत भाजपला "अच्छे दिन' आणले होते. 
पक्ष व डॉ. भामरे यांच्याशी बिनसल्याने हिरे भाजपपासून दुर गेले. आमदार पाटील यांना त्यांनी पाठिंबा जाहीर करत त्यांचा प्रचार सुरू केला. हिरे विरोधात गेले असले तरी जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, मनिषा पवार, जे. डी. हिरे आदींसह काही पदाधिकाऱ्यांना भाजपमध्येच रोखून धरण्यात पालकमंत्री गिरीश महाजन व भामरे यांना यश आले आहे. मंत्री भुसे यांनी मतदारसंघात केलेले भरीव काम, शिवसेना व भाजपचे असलेले संघटन व पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता डॉ. भामरे यांना किती मते मिळवून देते यावरच त्यांचे मताधिक्‍क्‍य अवलंबून असेल. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छूकांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. यामुळे दोघा उमेदवारांबरोबरच श्री. भुसे व श्री. हिरे यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. 

गेल्या निवडणुकीत मालेगाव बाह्यमधून डॉ. भामरे यांना एक लाख 12 हजार 763 तर कॉंग्रेसचे अमरीशभाई पटेल यांना केवळ 43 हजार 46 मते मिळाली होती. डॉ. भामरे यांना 69 हजार 487 एवढे मताधिक्‍य मिळाले होते. भाजपमधील अंतर्गत बंडाळी व अद्वय हिरेंची साथ नसल्याने यावेळी ते किती घटेल याबाबत उत्सुकता आहे. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी प्रचार सुरु केला असला तरी वाढत्या उन्हामुळे त्यात अजून रंगत भरली नाही. 

निवडणूक जाहीर होताच युती व आघाडीमध्ये धुसफूस होती. उमेदवारी नाकारल्याने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व त्यांचे समर्थक नाराज होते. आमदार पाटील यांनी त्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. पक्षाशी एकनिष्ठ असलेले डॉ. शेवाळे वेगळे पाऊल उचलणार नाहीत याची जाणकारांना खात्री होती. त्यानुसार डॉ. शेवाळे यांनी आमदार पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत कलह शमलेला नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुनील गायकवाड यांचे महानगर जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आले. त्यामुळे गायकवाड समर्थक नाराज आहेत. पक्षांतर्गत कलह मिटविण्याचे कसब डॉ. भामरे यांना करावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com