धुळे मनपातील वादग्रस्त वॉटरग्रेस अखेर ‘बाद’

कचरा संकलनप्रश्‍नी आता बोलायलाही शरम वाटते, जनतेला त्रास होतोय, त्याचे पाप आपल्या सगळ्यांना भोगावे लागेल.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation


धुळे ः शहरातील कचरा संकलनासाठी वॉटरग्रेस प्रॉडक्ट्सला (Garbage collection contract) दिलेले काम असेच सुरू राहावे यासाठी पडद्यामागे सुरू असलेल्या हितसंबंधी काही लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडत मनपा स्थायी समिती सभापती व सदस्यांनी अखेर ‘वॉटरग्रेस’चे काम बुधवार पासून बंद करण्याचा निर्णय घेतला. कचरा संकलनाच्या ठेक्यात (वॉटरग्रेस) निविदा प्रक्रियेपासूनच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याने या संपूर्ण प्रकरणाचे लेखापरीक्षण करावे, असा आदेशही सभापती संजय जाधव यांनी दिला. महापालिकेची (Dhule Municipal Corporation) स्थायी समितीची (Standing Committee Meeting) सभा गुरुवारी झाली. सभापती जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, अधिकारी, सदस्य (ऑनलाइन, ऑफलाइन) उपस्थित होते.

सदस्यांचे आरोप, संताप
कचरा संकलनप्रश्‍नी आता बोलायलाही शरम वाटते, जनतेला त्रास होतोय, त्याचे पाप आपल्या सगळ्यांना भोगावे लागेल, असे सदस्य अमीन पटेल म्हणाले. कमलेश देवरे यांनी वॉटरग्रेसला मुदतवाढ देण्यात कुणाचा इंटरेस्ट होता, २० टक्के काम व १०० टक्के बिल हा काय प्रकार आहे, असा प्रश्‍न केला. शीतल नवले यांनी पाकीट पोचल्याशिवाय बिले निघत नाहीत, असा थेट खळबळजनक आरोप केला. वॉटरग्रेस कंपनीने त्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ईपीएफ रक्कमही जमा केली नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. सुनील बैसाणे यांनी स्वच्छता निरीक्षकांच्या पत्राशिवाय ठेकेदाराचे बिल अदा होत नाही, त्यामुळे त्यांनाही जबाबदार धरावे, असे सांगितले. अमोल मासुळे यांनी या स्थितीला एकटा ठेकेदार नाही तर अधिकारी-कर्मचारीही जबाबदार असल्याचा आरोप केला.

ठेका बंद, बिलही रोखले
शेवटी सभापती जाधव यांनी वॉटरग्रेस कंपनीचे काम बुधवारपासून बंद करावे. मनपाने आपल्या स्तरावर काम सुरू करावे, असा आदेश दिला. वॉटरग्रेसचे मागील दोन महिन्यांचे बिल अदा करू नये, प्रभागनिहाय कामाचा अहवाल सभेपुढे ठेवावा. बिल अदा केल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही श्री. जाधव यांनी दिला.

मंत्र्यांना भेटू या!
नवीन कचरा ठेक्याला स्थगितीच्या प्रश्‍नावर सर्वपक्षीय नगरसेवक मुंबईत नगरविकासमंत्र्यांची भेट घेऊ व हा प्रश्‍न मार्गी लावू, अशी भूमिका समाजवादी पक्षाचे सदस्य अमीन पटेल, राष्ट्रवादीचे कमलेश देवरे यांनी मांडली. नवीन निविदाधारकाला काम देण्याचा, कार्यादेश देण्याचा संपूर्ण अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपल्याला असताना तो का दिला जात नाही, असा सवाल करत याला सत्ताधारी भाजप व अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत श्री. पटेल यांनी सभात्याग केला.

शहर आमदारांवर निशाणा
नवीन कचरा ठेक्याबाबत‍ नगरविकासमंत्र्यांकडे तक्रार करून, स्थगिती आणून आमदार फारूक शाह यांनी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप भाजप सदस्यांनी केला. सभापती जाधव यांनी कचऱ्याप्रश्‍नी आमदारांनी कधीच मनपा आयुक्तांना जाब विचारला नाही, त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. त्यांच्याशी आपला कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यामुळे या विषयावर कोणत्याही परिणामास सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com