आयुर्वेदिक औषध लिंबू खातोय भाव; किरकोळ बाजारात मिळतोय चांगला दर

आयुर्वेदिक औषध लिंबू खातोय भाव; किरकोळ बाजारात मिळतोय चांगला दर
lemon
lemonlemon

म्हसदी (धुळे) : फळबागा आणि भाजीपाला शेतीत काळगाव (ता. साक्री) येथील अनेक शेतकरी यशस्वी झाले आहेत. कोरोना काळात आयुर्वेदिक औषध ठरणारा लिंबू सध्या भाव खात आहे. कडक उन्हाळ्यात लिंबूची मागणी अधिक असल्याने काळगाव येथील युवा शेतकऱ्याची एक एकर क्षेत्रातील लिंबू शेती सध्या फायद्याची ठरत आहे.

काळगाव (ता. साक्री) हे गाव भाजीपाला, फळपिकाविषयी अग्रेसर मानले जाते. किंबहूना तेथील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद दिला आहे. एकेकाळी डाळिंब, सीताफळ, द्राक्षे, शेवगा, टोमॅटो यांसारख्या पिकांनी अनेक बाजारपेठांत गावाच्या नावाचा डंका वाजवला आहे. आज काळगाव येथील युवा शेतकरी नितीन ठाकरे यांनी डाळिंब, शेवग्याबरोबरच लिंबू शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. एक एकर क्षेत्रात लिंबू लागवड करत ‘कोशीश करनेवाले की हार नहीं होती’ हे दाखवून दिले आहे. अगदी कमी खर्चात हे पीक घेतले जात असून, अपवाद वगळता कीटकनाशकाची फवारणी केल्याचे ठाकरे कुटुंब सांगते.

माल विकण्याचाही प्रश्‍न

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यास शेतीव्यवसाय अपवाद असला तरी पिकवून विकता येत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या वाढत्या ससंर्गामुळे शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लावल्यामुळे अनेक दिवस बाजार समित्या बंद ठेवल्याने कष्टाने पिकवलेला शेतमाल कुठे विकावा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

किमान चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित

शेतीव्यवसाय परवडत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड रास्त असली तरी अलीकडच्या काळात वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. प्रत्येक हंगामात ज्यास मागणी असेल तशाच पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. शिवाय आयुर्वेदिक महत्त्व व सध्या कोरोना आजारावर ते उपयुक्त असल्याने मागणी आहे. किंबहूना आहारात अतिआवश्यक घटक असल्याचे वैद्यकीय सूत्रे सांगतात. एक एकर क्षेत्रात सुमारे दोनशे लिंबूची झाडे आहेत. स्थानिक ठिकाणासह मालेगाव, धुळे व साक्री बाजारपेठेत विक्री होत असली तरी साठ ते सत्तर रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. एकरभर क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी ‘सकाळ’ला दिली.

नाशवंत भाजीपाला सांभाळणे अवघडच..!

दुसरीकडे मुबलक प्रमाणात पाणी असल्याने भाजीपाल्याशिवाय कांदा उत्पादन चांगले होत असले तरी भाजीपाला पीक नाशवंत असल्याने जास्त दिवस ठेवणे अवघड आहे. शासनाने शीतगृहाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगतात. लॉकडाउनमुळे परप्रांतात विक्री होणारा भाजीपाला स्थानिक ठिकाणी भटकंती करत विकावा लागत आहे. कधी नव्हे ते यंदा कांदा पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडले पण ‘पिकवणे सोपे...विकणे अवघड’ अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च झाला असताना कांदा कवडीमोल विकावा लागत आहे. सधन शेतकरी चाळीत कांदा संग्रही करत आहेत. दर वाढतील या अपेक्षेने कांदा चाळीत संग्रही केला जात आहे.

मुबलक पाणी आणि अल्प खर्चात लिंबू शेती करता येते. अपवाद वगळता कीटकनाशकाची फवारणी केली जाते. इतर पिकांच्या तुलनेत लिंबू शेती फायदेशीर आहे. शासनाने भाजीपाला पिकासाठी शीतगृह उभारावे.

- नितीन ठाकरे, युवा शेतकरी, काळगाव

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com