esakal | कोरोनानंतर दात, हिरड्यांसंबंधी जडताय हे आजार

बोलून बातमी शोधा

after corona gums problem

कोरोनानंतर दात, हिरड्यांसंबंधी जडताय हे आजार

sakal_logo
By
अश्‍पाक खाटीक

धुळे : कोरोनाचा उद्रेक आणि त्यात उपचारानंतर सुखरूप घरी परतलेले डायबेटिस, ब्लडप्रेशरचे रुग्ण, तसेच इतर आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले काही रुग्ण सध्या नवीन आजाराचा सामना करत आहेत. त्यांना दातासंबंधी काही आजार जडत असल्याची माहिती धुळ्यातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. राजेश ओसवाल, डॉ. श्रेणिक ओसवाल यांनी ‘सकाळ’ दिली.

कोरोनासंबंधी उपचारांनंतर काही रुग्णांचे दात किडलेले नसतानाही ते व जबडा डोळ्यांपर्यंत खूप दुखणे, हिरड्यांना सूज येणे, दात हलायला लागणे आदी प्रकार पुढे येत आहेत. हा आजार वरचा जबडा व डोळ्यांपर्यंत असण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. काहींना खालच्या जबड्याचाही आजार होत आहे. यात ९० टक्के संबंधित रुग्णांमध्ये अनियंत्रित डायबेटिस आढळत आहे. कोरोनासंबंधी उपचारांनंतर तीन ते चार आठवड्यांत वरील आजाराची लक्षणे संबंधित काही रुग्णांमध्ये दिसायला लागतात. या जागेतून बायोप्सी घेतली व तपासणी केली तर म्युकारमायकोसिस नामक म्हणजेच बुरशी (फंगस) असा आजार दिसून येतो.

‘तो’ आजार का वाढतोय?

यावरील लक्षणे व आजाराचे प्रमाण अधिक दिसते. डॉक्टरांनाही इतक्या प्रमाणात असे रुग्ण बघण्याची सवय नव्हती. काही रुग्ण दुखण्यामुळे दात काढणे किंवा रुटकॅनलचे उपचार घेतात. परंतु त्या मुळे आराम मिळत नाही. म्युकारमायकोसिसचे रुग्ण वर्षातून दोन ते चार या प्रमाणात आढळायचे. आता महिन्यातून १५ ते २० पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनातून बरे होण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉइड्स‌चे इंजेक्शन व गोळ्या, अनियंत्रइत डायबेटिस, कोरोना या आजाराचे प्रमाण ९० टक्के आहे, अशा रुग्णांना टॉसिलिझुमॅब इंजेक्शन दिल्याचे आढळले आहे. अशा रुग्णांवर उपचार म्हणजे खराब जबडा व दात ऑपरेशनद्वारे काढणे, काहींचा डोळा काढावा लागणे आणि याचा अर्थ जबडा व दात काढल्यानंतर खायचे कसे, ही नवीन समस्या ऐरणीवर येते. यासंबंधी शस्त्रक्रियेसाठी अधिक खर्च येतो. यात पूर्ण भूल देणे, ऑपरेशन थिएटरसह औषधांचा खर्च व परत शस्त्रक्रियाही करावी लागू शकते.

महागडे उपचार व हानी

शस्त्रक्रियेनंतर अमफोटेरेसिन (amphoterisin b) नामक औषध ३० दिवसांत द्यावे लागते. ते खूप खर्चिक आहे आणि ते इंजेक्शन मिळणे अवघड झाले आहे. एका इंजेक्शनची किंमत तीन हजार रुपये आहे. या इंजेक्शनचा खर्च सुमारे एक लाख रुपयांवर जातो. संबंधित आजार का होतो, यावर संशोधन करणे गरजेचे आहे. जेणे करून त्यावर रोखणे शक्य होऊ शकेल. या आजारामुळे होणारे जबड्याचे व दातांचे कायमस्वरूपी नुकसान शरीरासाठी हानीकारक आहे, असे डॉ. राजेश ओसवाल, डॉ. श्रेणिक ओसवाल यांनी सांगितले.

संपादन- राजेश सोनवणे