esakal | सर्व्हिस रोड न दिल्यास १ मेपासून टोलवसुली बंद

बोलून बातमी शोधा

toll plaza
सर्व्हिस रोड न दिल्यास १ मेपासून टोलवसुली बंद
sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : येथील टोलप्लाझाच्या दुर्लक्षामुळे गावाजवळ महामार्गालगत ७५ टक्के पथदीप, तसेच हायमास्ट बंद पडले आहेत. अपघातांचे प्रमाण वाढले असून, दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड बनवावा, स्थानिक वाहनांना टोल फ्री करावे, अन्यथा १ मेपासून टोलप्लाझावर आंदोलन करून टोलवसुली करू देणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या वैशाली चौधरींचे प्रतिनिधी भाजपचे ज्ञानेश्वर चौधरी, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, उपसरपंच प्रतिनिधी धाकूशेठ बडगुजर व ग्रामस्थांनी दिला आहे.

येथील वाघाडी फाटा अपघातप्रवण क्षेत्र झाले असून, तेथे उड्डाणपूल व सर्व्हिस रोड न देता महामार्गावर वाघाडीकडे जाण्यासाठी क्रॉसिंग दिली. मात्र, सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. विशेष म्हणजे येथे उतार असल्याने शिरपूरकडून वाहने भरधाव येतात. त्याच वेळी वाघाडीकडून येणारी वाहने क्रॉस करत असताना, अपघाताचा धोका वाढला आहे. टोलप्लाझा कंपनीने उड्डाणपूल न देता अपघात कमी करण्यासाठी महामार्गावर अवैध गतिरोधक टाकले. त्यामुळे अपघातांचे प्रमाण उलट वाढले.

सुरक्षेच्या दृष्‍टीने नाही उपाययोजना

चौपदरीकरण करताना महामार्गालगत गावांना सर्व्हिस रोड, पथदीप व उड्डाणपूल आदी सुविधा पुरविल्या पाहिजेत. रुग्णवाहिका वगळता सुरक्षेच्या दृष्टीने अन्य कोणत्याही उपाययोजना टोलप्लाझा प्रशासनाने केलेल्या नाहीत. अपघातानंतर अनेक वेळा ग्रामस्थांनी आंदोलने केली. मात्र, आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार टोलप्लाझा प्रशासनाने केला. आंदोलन संपले, की पुढे जैसे थे परिस्थिती, असा अनुभव आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जिवाशी चालणारा हा खेळ कधी थांबेल, हा प्रश्नच आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्ञानेश्वर चौधरी, चेतन चौधरी, धाकूशेठ बडगुजर, ग्रामपंचायत गटनेते आर. के. माळी, सदस्य राजेंद्र जाधव, समाधान पाटील, लखन ठेलारी, अल्ताफ कुरेशी, मनुकुमार पटेल यांनी टोलप्लाझा प्रशासनाला निवेदनातून अखेरचा अल्टिमेटम देत समस्या सोडवाव्यात, अन्यथा १ मेपासून टोलवसुली बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

संपादन- राजेश सोनवणे