esakal | कोरोना काळात "शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रम"
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात "शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रम"

शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला असला तरी स्मार्ट फोन,स्मार्ट टी.व्ही.नसल्यामुळे तसेच रेंज कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाहीत.

कोरोना काळात "शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रम"

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

तऱ्हाडी ः शिरपूर तालुक्याच्या उत्तरेकडील सातपुड्याच्या पायथ्याशी 'चारणपाडा' हे एक छोटेसे गाव.काठेवाडी चारण,भरवाड आणि मूळचे पावरा समाजाचे वास्तव्य येथे आहे. हजार अकराशे लोकसंख्या असणारे टुमदार गाव.गायी-गुरांचे पालन करणे,दुग्ध-व्यवसाय करणे तसेच शेती आणि शेतमजुरी करणे हा येथील पालकांचा व्यवसाय.या गावात इ.1ली ते 4 थी जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेचा पट 88 आहे व 3 शिक्षक कार्यरत आहेत.

जेमतेम तुटपुंज्या मजुरीवर गुजराण करणारे येथील पालक ऑनलाईन शिक्षणासाठी आपल्या मुलांना मोबाईल कसा घेऊन देतील. मुलांचे सोडा तर पालकांजवळ देखील स्मार्ट मोबाईल नाहीत.अशा परिस्थितीत आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नसतांनाही पालक काही करू शकत नाही. शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला असला तरी स्मार्ट फोन,स्मार्ट टी.व्ही.नसल्यामुळे तसेच रेंज कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाहीत.

शिक्षकांची कल्पकता

शाळेच्या शिक्षकांमध्ये मात्र कमालीची कल्पकता आणि उत्साह दिसून आला. राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मनोहर चौधरी या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. किरण कोळी सर व रतीलाल पावरा सर हे उपक्रमशील शिक्षक त्यांचे सहकारी आहेत.शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहवत नव्हते.काय करावे सुचत नव्हते.

शालेय समितीचे सहकार्य
शिक्षण विस्तार अधिकारी व  केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनात शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून या तीनही शिक्षकांनी सोशल डिस्टन्स ठेऊन थेट शिक्षण मुलांच्या दारी घेऊन जाण्याचा उपक्रम हाती घेतला. पालकांना व विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स ठेऊन गटागटाने अभ्यासाला बसवले.स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांना मार्गदर्शन केले.जेणेकरून कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षकांनी ऑफलाईन शिक्षण देण्याची शक्कल लढवली.

विद्यार्थ्यांमध्ये आमुलाग्र बदल

विद्यार्थी व पालकांकडे मोबाईल नाहीत ही बाब हेरून 'समस्या तिथे मार्ग,गरज तिथे शोध'या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळावे व शैक्षणिक सातत्य असावे.नियमित शाळेप्रमाणे विद्यार्थी घरी राहूनच घरातील उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा वापर करून अध्ययन करीत आहेत."शाळा बंद, शिक्षण सुरू"या उपक्रमामुळे मुलांच्या आनंदासोबतच शैक्षणिक प्रगतीत सातत्य व आमूलाग्र बदल दिसत आह

असा आहे उपक्रण 
शालेय व्यवस्थापन समिती च्या सभा घेणे , घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप. शाळा, वर्गखोल्या सफाई, शालेय परिसर स्वच्छ, परसबागेची निगा राखणे, वृक्षारोपण करणे असे तिन्ही शिक्षकांनी उपक्रम सुरू ठेवून शाळेशी व विद्यार्थ्यांशी त्यांनी नाळ जोडून ठेवली आहे.   

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top