"ऍप'द्वारे घरबसल्या होऊ शकतात उपचार...कसे ते वाचा  

doc on app
doc on app

साक्री : सर्वत्र "कोरोना'च्या भीतीचे सावट आहे. यातच अनेक ठिकाणी "कोरोना'चे रुग्ण सरकारी रुग्णालयात जाण्यापूर्वी काही खासगी डॉक्‍टरांकडे गेल्याने याचा फटका या डॉक्‍टरांनाही बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी खासगी हॉस्पिटलही बंद आहेत. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वचजण प्रयत्नशील असताना आता यावर एका नवा पर्याय समोर येताना दिसतोय. सध्या एक "डॉक ऑन' (डॉक्‍टर ऑनलाइन) नावाचे मोबाईल ऍप डॉक्‍टरांसह रुग्णांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्‍यता आहे. त्याचा उपयोग साक्री शहरातही सुरू झाला आहे. 
कोरोनाचा रुग्ण कधी आणि कसा आपल्याकडे येऊन जाईल, या भीतीतून अनेक हॉस्पिटल सध्या बंद झाले आहेत. जे काही सेवाभावी डॉक्‍टर या काळातही रुग्ण तपासणी करत होते, त्यातील बहुतांश जणांकडे कोरोनाचा रुग्ण जिल्हा रुग्णालयात जाण्याआधी येऊन गेल्याने खबरदारी म्हणून त्यांनाही "होम क्वारंटाइन' होण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत अनेक डॉक्‍टर नवीन रुग्ण घेत नसल्याने याचा रुग्णांना फटका बसतोय. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न होत असताना आता एक नवीन पर्याय समोर येताना दिसतोय. 

मोबाईल ऍपची होईल मदत 
ऍन्ड्रोइड मोबाईलच्या काळात अनेक नवनवीन ऍप दररोज येत असतात. अशातच सध्याच्या या परिस्थितीत "डॉक ऑन' नावाचे एक ऍप आले असून, त्याच्या मदतीने किरकोळ दुखण्याच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न जाताही घरी बसून उपचार घेता येऊ शकणार आहेत. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यात आपला मोबाईल नंबर समाविष्ट करून नोंदणी करता येते, त्यानंतर त्यात गरजेनुसार आपल्या ओळखीतील अथवा अन्य तज्ज्ञ डॉक्‍टरांची वेळ (अपॉइंटमेंट) घेता येते, मात्र त्यासाठी त्या डॉक्‍टरांचीही नोंद ऍपमध्ये असणे आवश्‍यक आहे. डॉक्‍टरांची तपासणी शुल्कही ऑनलाइन भरण्याचा यात पर्याय आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर वेळेच्या (अपॉइंटमेंट) नोंदीनुसार डॉक्‍टरांकडून आपल्याला फोन केला जातो व त्रासाबद्दल विचारणा केली जाते. गरज वाटल्यास व्हीडीओ कॉलही करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. फोनवर बोलून झाल्यानंतर आवश्‍यक औषधांची नावे आणि अन्य तपशील (प्रिस्क्रिप्शन) डॉक्‍टर आपल्याला "एसएमएस'वर पाठवतात, त्यानंतर ते घरातील अन्य कुणीही मेडिकलवर जाऊन ती औषध घेऊन येऊ शकतो. यातून आपण घरात बसूनच किरकोळ दुखण्यावर डॉक्‍टरांकडून उपचार करून घेऊ शकतो. 

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यासाठी हे मोबाईल ऍप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आतापर्यंत माझ्या सुमारे 100 हून अधिक नियमित रुग्णांनी हे ऍप डाउनलोड केले असून, गेल्या दोन दिवसांत 15 ते 20 रुग्ण या माध्यमातून तपासलेदेखील आहेत. 
- डॉ. प्रशांत अहिरराव, साक्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com