भातशेतीसाठी ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाचा आदिवासी भागात वापर !

भातशेतीसाठी ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाचा आदिवासी भागात वापर !

वार्सा : पिंपळनेरमधील (ता. साक्री) आदिवासी भागातील सरासरी २६ शेतकऱ्यांनी मागील वर्षापासून, तर यंदा १०० शेतकऱ्यांनी अशा, एकूण १२६ शेतकऱ्यांनी सगुण भात तंत्रज्ञानाचा (एसआरटी) वापर सुरू केला आहे. बियाणे खर्च, मजुरी या सर्वांत बचत करून एकरी उत्पादनवाढीचे उद्दिष्ट त्यात आहे. पूर्वी एकरी १० ते १२ क्विंटलच्या दरम्यान असलेले उत्पादन आता एकरी १५ ते १६ क्विंटलपर्यंत पोचले आहे. 

सीड (SIED) वॉटर संस्था, जीआयझेड, टाटा ट्रस्ट व नाबार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना प्रयोगासाठी तंत्रज्ञान व मार्गदर्शन पुरवले आहे. पिंपळनेर भागात कुडाशीजवळील भागात बरीचशी आदिवासी खेडी आहेत. ही सर्व खेडी डोंगराच्या पायथ्याशी व निसर्गरम्य परिसरात आहेत. या ठिकाणी सरासरी १००० ते १२०० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडत असतो. त्यामुळे खरीप हंगामात ‘भात’ हे या भागातील प्रमुख पीक आहे. या आदिवासी भागातील मोहगाव, पिंपळपाडा, शेंदवड, मांजरी, चोरवड अशा या पाच गावांची निवड करण्यात आलेली आहे. पारंपरिक व ‘श्री’ पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी भाताची रोपवाटिका चिखलणी, लागवड व अवनीसह भातशेतीची कामे कष्टाची व खर्चिक आहेत. त्यामुळे या गावातील निवड केलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीपेक्षा सुधारित तंत्राचा वापर करण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी सीड संस्थेची त्यांना मदत होत आहे. संस्थेचे पिंपळनेर येथील विभागीय कार्यक्रम अधिकारी नामदेवराव नागरे, कमलाकर महानुभाव, तानाजी नागरे व शिवराम चौरे यांच्या मार्गदर्शनातून मागील वर्षापासून सगुण भात तंत्रज्ञान (एसआरटी) उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी २६ शेतकरी यात सहभागी झाले होते. यंदा त्यात १०० शेतकऱ्यांची भर पडली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे प्रयोगासाठी क्षेत्र सुमारे २० गुंठे आहे. 

 
प्रकल्पाची अंमलबजावणी 
सगुण भात तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी वरील पाच गावांतील ५० शेतकऱ्यांची पेंद्शेत (ता. अकोले) या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या गावातील काशीनाथ चेंडू खोले यांच्या शेतावर खरीप हंगामापूर्वी भेट व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. श्री. खोले सात ते आठ वर्षांपासून एसआरटी पद्धतीने भाताची शेती करतात. यात आदर्शातून सीड (वॉटर) संस्थेने या तंत्राला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली. भातलागवडीचे दोन मार्कर खोले यांच्याकडून खरेदी केले. खरीप हंगाम २०१९ मध्ये एसआरटी पद्धतीसाठी मोहगाव, शेंदवड, पिंपळपाडा, मांजरी व चोरवड या पाच गावांतील २६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या हंगामात जूनमध्ये उशिरा पावसास सुरवात झाल्यामुळे सुरवातीला ज्या शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने पेरणी केली, त्यांना त्याचा फारच चांगला अनुभव आला. त्या वेळेस इतर शेतकऱ्यांनी भाताची रोपवाटिका तयार केली व त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भाताच्या रोपांची पूर्ण लागवड केली. अशीच परिस्थिती २०२० च्या खरीप हंगामात जूनमध्ये पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे या पाच गावांतील ५० शेतकऱ्यांनी १२ मार्करच्या सहाय्याने २० गुंठे शेतावर एसआरटी पद्धतीने पेरणी केली. त्यानंतर जुलैमध्ये पावसाचा ताण पडला, तरी या पद्धतीतील भाताच्या पिकास चांगले फुटवे फुटले व पिकांची जोमदार वाढ झाली, तोपर्यंत पारंपरिक पद्धतीतील भाताची रोपवाटिका शेतात उभी होती. रोपांची खूपच वाढ झाली व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रोपांची पुनर्लागवड करण्यास सुरवात झाली. 
 

श्रम, खर्चात बचत 
पारंपरिक पद्धतीत लागवडीसाठी एकरी साधारण पंचवीस ते तीस किलो बियाणे लागते; परंतु या पद्धतीत अवघे १० ते १२ किलोपर्यंत बियाणे लागत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र त्या पद्धतीत रोपनिर्मितीपासून, चिखलणी, लागवड, अवनी व अन्य कामासाठी एकरी किमान १५ हजर रुपये खर्च यायचा. आठ ते दहा माजुरांना तीन दिवसांचा अवधी जायचा. सगळ्यांची कामे एकाच वेळी येत असल्याने वेळेवर मजूरही मिळत नसत. एसआरटी तंत्राचा अवलंब सुरू केल्यापासून श्रम, वेळ व खर्चात बचत झाली. शिवाय लागवडीसाठी गादीवाफ्यांचा वापर होऊ लागला आहे. दोन किंवा तीन व्यक्ती एका दिवसात कमी कालावधीत लागवड करू शकणार आहेत. शिवाय या तंत्राद्वारे रोपांची वाढ एकसारखी होते. रोपे मरणे किंवा जळण्याचे प्रमाण कमी होते. पारंपरिक पद्धतीत जिथे एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे, तेथे आता एकरी तीन ते चार क्विंटलची वाढ होऊन ते एकरी १३ ते १६ क्विंटलपर्यंत मिळू लागले आहे. 

पारंपरिक भात शेतीतील त्रुटी 
भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी उन्हाळ्यात झाडांच्या फांद्या तोडून त्या जाळून रोप टाकण्यासाठी जमीन भाजावी लागायची. रोपे २१ ते २५ दिवसांची झाल्यानंतर पूर्ण लागवड करावी लागायची. खेकड्यांच्या त्रासाने रोपे खराब व्हायची. जास्त पाऊस झाल्यास रोपे सडून जायची व कमी पाऊस झाला किंवा पावसाचा ताण पडला तर रोपे जाळायची. लागवडीच्या वेळेस चोखाळणी करावी लागते. जमिनीतील मुख्य घटक व सेंद्रिय खते वाहून जातात. एकरी बियाणेही जास्त लागते. शिवाय दोन रोपांत व दोन ओळींत निश्‍चित अंतर नसते. अंदाजे लागवड असते. त्यामुळे आंतरमशागत व फवारणीत अडथळे येऊ शकतात. सुधारित तंत्रामध्ये या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपळनेर भागातील कुडाशी हा भाताचा पट्टा आहे. या भागातील शेतकरी आंबेमोहोर, कोकणी, पूनम आदी पारंपरिक जातींचा वापर करतात. पण, सध्या इंद्रायणी, दप्तरी यांसारख्या सुधारित वाणाचा वापर शेतकरी करत आहेत. या एसआरटी तंत्रज्ञानामुळे खर्चाची बचत होऊन, उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ झाली. शेतकऱ्यांच्या कष्टाला दिलासा मिळणार आहे. सध्या शेतकरी उत्पादन कंपनीच्या व स्थानिक महिला बचतगटांच्या माध्यमातून येथील तांदळाच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे तंत्रज्ञान पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

एसआरटी तंत्राच्या सुविधा 
- साक्री तालुक्यातील पाच आदिवासी गावांतील शेतकऱ्यांना होतोय तंत्रज्ञानाचा वापर 
 -१०० बाय ७५ सेमी रुंद आकाराचे लोखंडी मार्करने (यंत्र) त्यामध्ये तोकीसाठी छिद्रे गादीवाफ्यावर पाडली जातात. त्यात बियाण्याचे टोकन केले जाते. 
 -दोन ओळी व रापातील अंतर २५ सेमी, तर दोन वाफ्यांतील अंतर १०० सेमी, दोन वाफ्यांत दीड फुटाचा थोडासा खोलगट चर, जूनमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर त्वरित भाताच्या बियाण्याचे टोकन. 
 -सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी या प्रकल्पांतर्गत गांडूळखत उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे बियाणे टोकन करण्यापूर्वी गांडूळखताचा वापर व त्याबरोबरच एकरी ७० किलो यूरिया डीओपी ब्रिकेटचा शेतकरी वापर करतात. 
- बियाणे टोकनानंतर, अमृतपाणी ३० ते ४५ दिवसांनी फवारणी करणे, तसेच शेण, गोमूत्र, बेसनपीठ आणि गूळ यांचा वापर करून जिवामृतची स्लरी दोन ते तीन वेळा जमिनीला दिली जाते. 
 -सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादनावर जोर असल्यामुळे, जमिनीतील सेंद्रिय खर्च व कार्यक्रम लाभदायक सूक्ष्म जीवाणूंच्या संख्येत वाढ. 
 -सर्व बाबींचा काटेकोर वापर, त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेत वाढ. 
 -भात पिकांच्या काढणीनंतर, रब्बी हंगामात गादीवाफ्यांवर हरभरा व

भाजीपाला घेण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन. 
आम्ही यापूर्वी पारंपरिक पद्धतीने भाताचे उत्पादन घेत होतो. दोन वर्षांपासून एसआरटी पद्धतीचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वेळेत व खर्चात बचत होऊन भाताचे उत्पादन वाढले आहे. या पद्धतीचा आमच्या भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वापर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 
-मोन्या जिवल्या काळघे, चोरव  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com