esakal | एकीच्या बळातून दोन गावांचा झाला कायापालट !
sakal

बोलून बातमी शोधा

एकीच्या बळातून दोन गावांचा झाला कायापालट !

चार गावांसह परिसराला पाठबळ दिल्याने पाण्याची उपलब्धता, कोरडवाहू क्षेत्र बागायती, त्यात दुग्ध व्यवसायाची भर पडू शकली. 

एकीच्या बळातून दोन गावांचा झाला कायापालट !

sakal_logo
By
विजय बागल

निमगूळ ः एकीचे बळ मिळते फळ या उक्तीची प्रचिती रहिमपुरे आणि कुरूकवाडे (ता. शिंदखेडा) गावाने खरी ठरविली. लोकसहभाग, लोकवर्गणी आणि देशबंधू व मजू गुप्ता फाउंडेशन मिळून उभारलेल्या ३२ लाखांच्या निधीतील बंधारे वरूणराजाच्या कृपेने तुडूंब भरल्याने या दोन गावांत कायापालट दिसू लागला आहे. मेहनतीचे चीज झाल्याने ग्रामस्थही सुखावले आहेत. 

लोकसहभागासह देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशनने कुरकवाडे आणि रहिमपुरे येथे जलक्रांतीची कास धरली. फाउंडेशनने एकूण चार गावांसह परिसराला पाठबळ दिल्याने पाण्याची उपलब्धता, कोरडवाहू क्षेत्र बागायती, त्यात दुग्ध व्यवसायाची भर पडू शकली. 

रहिमपुरेत कायापालट 
रहिमपुरेत भीषण पाणीटंचाई होती. विहिरी व कूपनलिकेचा अपेक्षित लाभ मिळत नव्हता. असे असताना (कै.) व्ही. के. पाटील व परिवार, सामाजिक कार्यकर्ते राजेश मुनोत, रमेश पारख, विजय टाटिया यांच्यासह ग्रामविकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दानशूरांच्या मदतीने आठ लाखांचा निधी उभारला. गुप्ता फाउंडेशनने एकूण २४ लाखांचा निधी दिला. अशा एकूण ३२ लाखांच्या निधीतून बंधारा झाला. पाणी अडविल्याने रहिमपुरे व विखुरले येथील १५० एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. सरासरी ५० विहिरींची पातळी वाढली. कोरडवाहू क्षेत्र बागायती झाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. 

कुरूकवाडेत प्रगतीला संधी 
कुरुकवाडेलाही पाणी समस्या होती. गुप्ता फाउंडेशन आणि लोकवर्गणीतून तेथे बंधारा झाला. त्यामुळे कुरुकवाडेसह परिसरातील तीनशे एकर क्षेत्र बागायती झाले. गावात दुग्ध व्यवसाय वाढीस लागला. शेती व पूरक व्यवसाय प्रगतिपथावर येण्यास मदत झाली. दोन बंधाऱ्यातून सरासरी साडेचारशे ते पाचशेवर एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. यंदा वरूणराजाने साथ दिल्यामुळे सद्यःस्थितीत ३० फूटांच्या बंधाऱ्यात पाणीच पाणी असल्याची माहिती पोलिसपाटील प्रकाश पाटील यांनी दिली. 

रहिमपुरेत पिण्याचे पाणी मिळत नव्हते. जलक्रांतीमुळे पिण्याच्या पाण्यासह कूपनलिका व विहिरींच्या पातळीचा प्रश्‍न सुटला. बागायत क्षेत्रात वाढ झाली. ग्रामस्थांना एकीसह ‘पाणी आडवा- पाणी जिरवा’चे महत्त्व समजले. 
-अरुण पाटील, सामाजिक कार्यकर्ता 
 

संपादन- भूषण श्रीखंडे