esakal | दोंडाईचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड 
sakal

बोलून बातमी शोधा

दोंडाईचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील तोडफोड व झालेला हल्ला निंदनीय असून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 

दोंडाईचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड 

sakal_logo
By
सदाशिव भालकार

दोंडाईचा ः येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. एकनाथ भावसार यांचे वकील व्यवसायाच्या कार्यालयालयाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयात दोन जणांनी बळजबरीने घुसून धुडगूस घालत तोडफोड केली. कार्यालयातील क्लर्क यांच्यावर लोखंडी कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिस कर्मचारी पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर ही कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विक्की उर्फ विवेक अजय निकवाडे तसेच छोटू उर्फ दिनेश सदाशिव शिंपी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाच्या कार्यालयातील तोडफोड व झालेला हल्ला निंदनीय असून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 

वाचा-  कोरोना दक्षतेचे नियम पाळत नंदुरबारमध्ये बारावीच्या पुर्नपरिक्षांना प्रारंभ -

शहरातील राम मंदिर रोडवर ॲड एकनाथ भावसार यांचा वकिली व्यवसाय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे. शुक्रवारी (ता २०) सकाळी साडेनऊच्‍या सुमारास विवेक निकवाडे व त्याचा साथीदार छोटू शिंपी मोटरसायकलने आले आणि कार्यालयात घुसले. ऑफिसचे कामकाज पाहणारे छोटू सैंदाणे याच्या डोक्यावर लोखंडी कोयत्याने वार केला. ते बघून पोलिस कर्मचारी योगेश पाटील हे कार्यालयात दोघांना पकडण्यासाठी आले असता त्यांच्यावर देखील कोयत्याने वार करण्याचा प्रयत्‍न केला. घटनेची माहिती मिळताच अॅड. एकनाथ भावसार कार्यालयात आले. तो पर्यंत दोघांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. संशयित दोघांनी कार्यालयात तोडफोड केली आहे. यापूर्वी २०१९ मध्य विक्की उर्फ विवेक निकवाडे यांने आपल्या साथीदारांसह तात्कालिन न्यायाधीश यांच्या निवासस्थानी दगडफेक प्रकरणी वकीलपत्र नाकारल्याचा राग त्याच्या मनात असल्याने ते माझा शोध घेऊन ठार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अॅड एकनाथ भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

राष्ट्रवादीकडून घटनेचा निषेध 
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर केलेला हल्ला निंदनीय आहे. त्याचा निषेध करतो. घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पक्षाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन घटनेचा खोलवर तपासाची मागणी आम्ही करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी कार्यालयातील तोडफोडीची पहाणी केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे