दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय "सलाईन'वर! 

dondaicha upjilha hospital
dondaicha upjilha hospital

दोंडाईचा : डॉक्‍टरांमधील मतभेदापासून दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कुठली समस्या नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. रुग्णालयातील वर्ग एकच्या वैद्यकीय अधीक्षकांसह तब्बल 16 पदे रिक्त आहेत. रुग्णवाहिका सुरळीत सेवा देऊ शकत नाही. काही तपासणी यंत्रे धूळखात पडून आहेत. प्रसंगी शिरपूर येथे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवावे लागतात. त्यामुळे "सलाईन'वर असलेल्या समस्याग्रस्त उपजिल्हा रुग्णालयावर ठोस उपचाराची गरज आहे. संकटकाळातही "कोरोना'च्या रुग्णांसाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय तत्पर असल्याने ही जमेची बाजू आहे. 

रुग्णालयाची स्थिती 
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात मंजूर 48 पैकी 32 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा देताना त्यांची दमछाक होते. सात वर्षांपासून वर्ग एकचे वैद्यकीय अधीक्षकपद रिक्त आहे. शिवाय अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. कामाचा अतिरिक्त ताण, अंतर्गत मतभेदांमुळे आरोग्य यंत्रणा खचलेली दिसते. रेल्वे स्थानक, बाजार समितीसह दोंडाईचा व ठिकठिकाणच्या रुग्णांचा रुग्णालयावर भार असतो. त्यामुळे दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय सक्षमतेने कार्यरत असावे, अशी अपेक्षा व्यक्त होते. "कोरोना'ने दोंडाईचात शिरकाव केल्याने सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना रुग्णालयाची ओढाताण होते. 

जीव मुठीत घेऊन काम 
"कोरोना'बाधित 11 रुग्ण दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चंद्रे चौदा दिवस होम क्वारंटाइन झाले. त्यामुळे यंत्रणा संभ्रमात पडली. रुग्णालयात कोविड, नॉन- कोविड, तसेच अन्य रुग्णांची "ओपीडी' एकाच इमारतीत असल्याने जोखीम वाढली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांसह अनेकांचा जीव कामकाजावेळी मुठीत असतो. रुग्णालयात पॉझिटिव्ह महिला व पुरुषांचा स्वतंत्र वॉर्ड करावा लागेल. संबंधित डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था नाही. 

रुग्णवाहिकेचा प्रश्‍न 
जुनी रुग्णवाहिका सतत नादुरुस्त होते. त्यामुळे प्रसंगी संदर्भीय सेवेसाठी रुग्णाला धुळ्यात पाठवावे लागते. दुरुस्त असली तरी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाही. सातत्याने मागणी होऊनही नवीन रुग्णवाहिका मिळालेली नाही. 

मशिन धूळखात पडून 
रुग्णालयातील प्रयोगशाळेत लॅब टेक्‍निशियन, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. त्यामुळे ऍनालायझर, सेल काउंटरसारखे रक्त तपासणीचे मशिन नादुरुस्त व धूळखात पडले आहे. प्रसंगी शिरपूर येथे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवावे लागतात. शवविच्छेदगृहातील तीन पेट्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहेत. त्या दुरुस्त होण्याची गरज आहे. जेणेकरून दुर्गंधीचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. रुग्णालयाच्या सर्व समस्या वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाठपुराव्यातून तत्काळ सोडविण्याची गरज आहे. 
 
दोंडाईचात रिक्त पदे... 
वर्ग एकचे वैद्यकीय अधीक्षक, कक्ष सेवक, एक शस्त्रक्रिया विभागातील, वर्णोपचार, सहायक पर्यवेक्षिका, परिचारिका, लॅब टेक्‍निशियन, सहायक लॅब टेक्‍निशियन, औषधनिर्माता, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, दंत चिकित्सक, दोन परिसेविका, दोन शिपाई, अशी 16 पदे रिक्त आहेत. 
 
भार असूनही दुर्लक्ष का? 
दोंडाईचात कुटीर रुग्णालयाची स्थापना 10 फेब्रुवारी 1983 ला झाली. तेव्हा 30 खाटा होत्या. बळकटीकरणानंतर उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले. त्यामुळे नवीन इमारतीत 50 खाटा उपलब्ध झाल्या. नंतर ही क्षमता वाढ झालेली नाही. रुग्णालयात रोज 200 वर रुग्ण उपचारासाठी येतात. सरासरी 10 ते 15 जण आंतररुग्ण म्हणून उपचार घेतात. रुग्णालयावर भार असूनही समस्यांकडे सर्व पातळीवर दुर्लक्ष होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com