एक बुरुजाचा एकमेव डुबेरेचा बर्वे वाडा 

आनंद बोरा
शुक्रवार, 18 मे 2018

नाशिक ः नाशिकपासून पन्नास किलोमीटर अंतरावरील डुबेरे (ता. सिन्नर) हे गाव. या गावातील बर्वे वाडा थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्राची शान आहे. 320 वर्षांचा पेशवेकालीन वाडा सुस्थितीत उभा आहे. वाड्यामुळे तीन गल्ल्या आहेत. दक्षिण-उत्तर, आतील बोळ पूर्व-पश्‍चिम अशी गावाची रचना झाली. किल्ला, वाड्याला दोन, चार पटीत बुरुज असतात. पण हा वाडा एक बुरुजाचा आहे. 

नाशिक ः नाशिकपासून पन्नास किलोमीटर अंतरावरील डुबेरे (ता. सिन्नर) हे गाव. या गावातील बर्वे वाडा थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्राची शान आहे. 320 वर्षांचा पेशवेकालीन वाडा सुस्थितीत उभा आहे. वाड्यामुळे तीन गल्ल्या आहेत. दक्षिण-उत्तर, आतील बोळ पूर्व-पश्‍चिम अशी गावाची रचना झाली. किल्ला, वाड्याला दोन, चार पटीत बुरुज असतात. पण हा वाडा एक बुरुजाचा आहे. 

गावातील सटवाई माता मंदिर प्रसिध्द आहे. पावणे दोन एकरामध्ये हा वाडा बसलेला आहे. त्यात तीन चौक आहेत. मागील बाजूस पागेचे दार आहे. वाड्याच्या भिंती मातीत बांधल्या असल्या तरी त्या सुस्थित उभ्या आहेत. वाड्यातील खांबावरील नक्षीकाम पाहताच आपण पेशवेकाळात हरवून जातो. पक्ष्यांच्या आकृती आकर्षित करतात. वाड्यातील दोन आड, दोन विहिरी, तुळस-वृंदावन वैभवात भर टाकतात. वाड्याला त्याकाळात दोन मुख्य दरवाजे होते. आज केवळ पश्‍चिमेकडील दरवाजा सुरु असून पूर्वेकडील दरवाजा बंद करण्यात आला.

प्रवेशद्वारातून आत शिरताच रखवालदाराची देवडी दृष्टीक्षेपास पडते. त्यावरती नगारखाना लक्ष वेधून घेतो. वाड्यातील धान्याचे बळद उपयोगात आणले जात आहे. धान्य साठवून ते खालील एका भिंतीमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया खिळवून ठेवते. पेशवे कालीन तलवार, गेंड्याच्या कातडीपासून बनविलेली ढाल, भाला, आणि चिलखत वाड्यात पाह्यला मिळते. स्वयंपाकगृह, माजघर, कचेरी, बाळंतिणीची खोली वाड्यात आहे. उन्हाळ्यात थंड आणि थंडीत गरम राहणारी ही खोली. पलंगावरील कोरीवकाम अप्रतिम आहे. थोरले बाजीराव पेशव्यांचा जन्म या खोलीत झाला. 

बाजीरावांची तीनशेवी जयंती त्यांच्या वंशजांच्या उपस्थितीत 2000 मध्ये या ठिकाणी साजरी करण्यात आली. गावामध्ये बाजीराव पेशवे यांच्या नावाने पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेला त्यांच्या जयंतीनिमित्ताने गावातून मिरवणूक काढली जाते. स्पर्धा घेण्यात येतात. व्याख्याने होतात. आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. थोरले बाजीराव पेशवे यांचे देशात दोन पुतळे आहेत.

एक पुण्यातील शनिवार वाड्यात आणि दुसरा डुबेरे येथे. बर्वे कुटुंबियांना त्याकाळातील पाच पोती मोडी लिपीत लिहिलेली पत्रे सापडली होती. त्यांनी ती नगर येथे संशोधनासाठी दिली आहेत. डुबेरे गावाजवळ दाट वृक्षसंपदा, चिंचवन, डुबेर गड, औंदागड, पट्टाकिल्ला, आडगड, हे गड-किल्ले आहेत. 

ऐतिहासिक संदर्भ 
सिन्नर महाविद्यालयातील प्रा. चंद्रशेखर बर्वे यांचे वंशज मल्हार दादाजी बर्वे आणि त्याकाळातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे दोघे मेहुणे. लेखणी आणि तलवारीवर बाळाजी विश्वनाथ यांचे वर्चस्व होते. त्यामुळे ते नंतर पेशवे झाले. त्यांनी मल्हार बर्वे यांना गंथथडी प्रांताची (गोदावरी परिसर) सर देशमुखी दिली. मग मल्हार बर्वे यांनी डुबेरेमध्ये वाडा बांधला. बर्वे यांचे जिल्ह्यात चार पेशवेकालीन वाडे आहेत. निफाडजवळील कोठुरे, रामाचे पिंपळद, आणि पांढुर्ली मधील वाड्याचा त्यात समावेश आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी 20 वर्षात माळवा, धर, औरंगाबाद, पालखेड, अहमदाबाद, उदयपूर, फिरोजाबाद, दिल्ली, भोपाळ, वसई अशा 36 लढाया केल्या. त्यांचा जिंकण्याचा "सक्‍सेस रेट' शंभर टक्के राहिला. 

""आमचे मूळ पुरुष मल्हार दादाजी बर्वे यांनी 1695 च्या आसपास डुबेरेमध्ये वाडा बांधला असावा. वाड्यात थोरले बाजीराव यांचा जन्म झाला आहे. भविष्यात वाड्यात संग्रहालय करून बाजीरावांचा इतिहास मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. वाचनालय सुरु करण्याचाही मानस आहे. ही वास्तू राज्यातील प्रत्येकाने पाहावी अशी आमची इच्छा आहे.'' 
- प्रा. चंद्रशेखर बर्वे (सिन्नर महाविद्यालय) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dubare barve wada

फोटो गॅलरी