पीक कर्जाची रक्कम स्थानिक शाखेतूनच द्यावी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात. शेतकरी वर्ग कोरोना ह्या संसर्गजन्य आजाराच्या महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरी ह्यावर प्रशासनाने योग्य तो मार्ग काढून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात 
- प्रा. सुभाष पाटील, अध्यक्ष, विकासो सोसायटी, शिरूड ता. अमळनेर. 

अमळनेर : तालुक्‍यातील सन 2020-21 ह्या आर्थिक वर्षातील पीक कर्ज रक्कम बॅंकेने राष्ट्रीयकृत शाखेत न वर्ग करता शेतकऱ्यांच्या स्थानिक शाखेत वर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. 

तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज हे स्थानिक विकास सोसायटी मार्फत भरले. परंतु आता जळगाव जिल्हा बॅंकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप एटीएमद्वारा शहर क्षेत्र भागातील आयसीआयसीआय बॅंकेमार्फत केले जात आहे. याअगोदर जेडीसीसी बॅंक ही शेतकऱ्यांना मागील वर्षात पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत होती. पूर्ण रक्कम जेडीसीसीच्या स्थानिक शाखेत शेतकऱ्यांना खात्यातून काढून मिळत होती. परंतु ह्या वर्षी जेडीसीसी बॅंकेने शेतकऱ्यांच्या खात्यावरील पीक कर्ज 25 टक्के रक्कम ही खात्यातून गावातील स्थानिक शाखेत मिळणार आहे, तर उर्वरित रक्कम ही तालुकास्तरावर असणाऱ्या आयसीसीआयच्या एटीएम शाखेतून काढून घ्यायची आहे. 

तालुक्‍याला कोरोनाचा विळखा 
अमळनेर शहर- नागरी क्षेत्रात कोरोना ह्या संसर्गजन्य आजाराचा गंभीर प्रादुर्भाव असल्याने शहरात वाहन व इतरांना अत्यावश्‍यक कामाशिवाय प्रवेश करणे बंदी आहे. अमळनेर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात प्रवेशास बंदी असून, वाहनाच्या सोई पूर्णपणे बंद असल्याने शहरातील एटीएम मध्ये शेतकऱ्यांना पोहचण्यासह पीक कर्जे रक्कम मिळविणे अशक्‍य व दुरापास्त आहे. शिवाय ग्रामीण भागातील सुमारे 30 हजार शेतकऱ्यांना शहरात प्रदेश मिळणे अशक्‍य असून धोकादायक आहे. 

पीक कर्ज रक्कम पूर्ण द्यावी 
जिल्हा बॅंकेच्या शाखा ह्या ग्रामीण भागातच कार्यरत असल्याने शेतकऱ्यांना द्यावयाची कर्जे रक्कम ही ग्रामीण भागातील जिल्हा-बॅंकेच्या उप-शाखांत जमा झाल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जे रक्‍कमेची उचल करता येईल. जिल्हा बॅंकेने शेतकऱ्याची पीक कर्जे रक्कम शहरातील एटीएम मध्ये जमा न करता ग्रामीण शेतकऱ्यांच्या सोईसाठी तालुक्‍यातील ग्रामीण भागातील बॅंकांच्या उप-शाखांत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

बॅंकेचे धोरणामुळे अडचणीत वाढ 
जिल्हा बॅंकेने आसीआसीआय बॅंकेशी एटीएम वापराबाबत करार केला आहे. परंतु पीक कर्ज काढताना शेतकऱ्यांच्या खात्यातील एका वेळेस 10 हजार रुपये काढता येतात. त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यातून 20 रुपये वजा होत आहेत. दरदिवशी 10 हजार मिळत असल्याने व वृद्ध, निराधार शेतकऱ्यांना रोज अमळनेर येऊन रक्कम काढणे अशक्‍य आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer pik loan local bank branch avalable