पैशाचं तंत्र-  महत्त्वाची ग्रीक नाणी - 2

residentional photo
residentional photo

   जगाच्या इतिहासात ग्रीक राजवटीचा युरोपसह अनेक देशांवर प्रभाव राहिला आहे. त्यामुळे अर्थातच प्राचीन काळात ग्रीक नाण्यांचीही त्यांनी शासन केलेल्या, तसेच व्यापार केलेल्या प्रदेशांवरही छाप राहिली. असेच काही प्रदेश जिथे ग्रीकांचे शासन कधी काळी होते तेथील काही देशांच्या नाण्यांची आपण माहिती घेत आहोत. त्यातील काही प्रदेश आणि तेथील नाण्यांचा इतिहास आपण मागील भागात पहिला आहे. उर्वरित काही नाणी या लेखात पाहू या. 

 मायसिया ः मायसिया हा देश आशिया खंडात येतो. या देशात सर्वप्रथम ग्रीक नाणी वापरात आली. येथील सिझियम आणि ट्रोड या शहरात नाण्यांची निर्मिती आणि वापर सर्वांत अधिक होत असे. अशिमायनार या प्रदेशासोबतच आसपासच्या मोठ्या प्रदेशात ही नाणी स्वीकारली जात असत. जागतिक इतिहासात महत्त्वाच्या असणाऱ्या ट्रोजन युद्धाची चित्रे या नाण्यांवर असल्याने या नाण्यांना एक वेगळे महत्त्व आहे. 

 अयोनिया ः अयोनिया या प्रदेशात अंदाजे इसवीसनपूर्व 550 च्या आसपास नाणेनिर्मिती केली गेली. यातील महत्त्वाची नाणी म्हणजे ड्रकम व टेट्रॅड्रॅकम. ही नाणी सोन्याची होती आणि त्यावर देवतांची प्रतिमा छापलेली होती. यादरम्यान अयोनियामध्ये झालेल्या बंडाशी संबंधित आणि रोम साम्राज्याशी संबंधित काही दृश्‍येही या नाण्यांवर साकारली आहेत. 

 इफेसस ः इसवीसनपूर्व चौथ्या शतकात इफेसस येथे नाणी पाडली गेली. ही नाणी खूपच ओबडधोबड स्वरूपात आहेत. त्यांवर मधमाशी, काळवीट किंवा एखाद्या देवतेचा चेहरा कोरलेला असे. अनेक ठिकाणी सापडलेल्या विविध नाण्यांवर खूप वेगवेगळ्या प्रतिमा कोरलेल्या असल्याने त्यात फारशी सुसंगती दिसत नाही. काही नाण्यांवर अलेक्‍झांडरला स्वप्नात दिसलेल्या देवताही दिसून येतात. 

 ऱ्होडस ः गेल्या अनेक शतकांपासून ऱ्होड्‌स हे शहर कलाकुसरीच्या कामांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे इसवीसनपूर्व चौथ्या शतकात नाणेनिर्मिती झाली, त्यातही ही कलाकुसर दिसते. इथली नाणी अतिशय सुबक आणि काटेकोर आकारमानात आहेत. या शहराची निर्मिती कॅमिरस्‌, इअलिसस्‌ व लिंडस्‌ या तीन शहरांतील लोकांनी एकत्र येऊन झाल्याने येथे या तीन शहरांतील नाणी सापडली आहेत. 
 

फिनेशिया ः फिनेशिया हे समुद्रकिनाऱ्यावरील एक व्यापारी ठिकाण होते. पूर्वीची बहुतांश सर्व व्यापारी केंद्रे किनाऱ्यांवर वसलेली असल्याने हा प्रदेश सधन होता. फिनोशियातील ही सधनता त्या परिसरात विपुल प्रमाणात सापडलेल्या तत्कालीन नाण्यांवरून लक्षात येते. इसवीसनपूर्व पाचव्या शतकापासून येथे नाण्यांचा वापर सुरू झाला. या नाण्यांवर स्थानिक भाषेत माहिती कोरली आहे. फिनेशयन नाणी ही अलेक्‍झांडरपूर्व, अलेक्‍झांडर युग आणि साम्राज्यसत्ता युग अशा तीन भागांत विभागली आहेत. ती रूपे, कासे, चांदी आणि सोने अशा अनेक धातूंनी बनलेली होती. 

 लिसिया ः लिसिया प्रदेशातील नाणी इसवीसनपूर्व पाचव्या शतकात विकसित झाली. या नाण्यांवर तत्कालीन आशियातील सांस्कृतीचा उत्तम परिचय होतो. यावर प्राणी किंवा अन्य आकारातील काही आकृत्या आढळून येतात. लिशियन प्रदेशात अनेक शहरे होती. या भिन्न शहरांतील कला आणि संस्कृतीप्रमाणे त्या त्या शहरातील नाण्यांवर अनेक प्रकारच्या आकृत्या आढळून येतात. त्यावरून एका प्रदेशातही अनेक प्रकारच्या प्रथा-परंपरा पाळणारे लोक राहत होते हे लक्षात येऊ शकेल. 

 सीरिया ः सीरियात इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकापासून नाण्यांचा वापर दिसून येतो. सीरियात सेल्युसिड राजवंश व टॉलेमी हे दोन प्रमुख राजवंश होऊन गेले आहेत. या दोन्ही राजसत्तांनी आपापल्या साम्राज्य काळात नाण्यांची निर्मिती केली. टॉलेमी काळातील नाण्यांवरील आकृत्या अधिक ठसठशीत आणि सुबक आढळून येतात. मात्र या नाण्यांची उपलब्ध संख्या अतिशय कमी आहे. सेल्युसिड साम्राज्यातील नाणीही सुबक आहेत. त्यांवरील विविध राजांच्या शिक्‍क्‍यांवरून तत्कालीन ऐतिहासिक परिस्थितीचा अंदाज येतो.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com