जनतेचा जाहीरनामा - इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग इच्छाशक्तीअभावी कागदावरच 

residentional photo
residentional photo

मध्य रेल्वेच्या मार्गावरील महत्त्वाची स्थानके दिंडोरी लोकसभा मतदारसंघात असून, केंद्रीय अर्थसंकल्पात मनमाड स्थानकाचा देशातील शंभर स्थानकांत समावेश झाला. या जमेच्या पार्श्‍वभूमीवर मोठा गाजावाजा झालेल्या इंदूर-मनमाड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासह काही बाबींवर अर्थसंकल्पात तरतुदी झाल्या असल्या, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे-नरडाणा लोहमार्गाचे भूमिपूजन झाले असले, तरी इंदूर-मनमाड मार्गाच्या कामाला कधी मुहूर्त लागणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

.... 
इंदूर-मनमाड रेल्वेच्या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाल्यास मालेगाव, चांदवड, येवला, निफाड व नांदगाव-मनमाड भागातील पायाभूत विकासाची अनेक कामे मार्गी लागू शकतात. शिवाय रोजगाराच्या संधी त्यातून उपलब्ध होतील. "मॉडेल जंक्‍शन'च्या यादीत समावेश झाल्याने मनमाडच्या जनतेच्या मोठ्या अपेक्षा उंचावल्या. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद झाली. तरीही "मॉडेल जंक्‍शन'च्या विस्तारात स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. "मॉडेल जंक्‍शन'मध्ये 60 गाळ्यांसह मॉल असणार आहे. मात्र नियोजित मॉल व अन्य संकुलात गरजू सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी प्राधान्य दिले पाहिजे, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. नव्या "मॉडेल जंक्‍शन'च्या आधुनिक कॅंटिनमध्येही स्थानिकांना सामावून घेता येऊ शकते. 

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासह थांब्याचा विषय 
मनमाड स्थानकावर गीतांजली व राजधानी एक्‍प्रेससाठीचे थांबे मंजूर झाल्यास शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना ते सोयीचे ठरेल. इंडियन हायस्कूलच्या जागेवर फलाट एकचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर रेल्वे प्रशासनाने मार्ग काढला पाहिजे. पालखेडहून रेल्वेला पाणी आणावे लागते. त्यामुळे पाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून शाश्‍वत पर्याय उभा राहणे गरजेचे बनले आहे, अन्यथा नांदगावला कधी काळी असलेले लोकोशेडसारखे प्रकल्प ज्या तऱ्हेने स्थलांतरित झाले, तशी वेळ मनमाडवर येऊ नये, अशी सर्वसाधारण अपेक्षा पंचक्रोशीतील रहिवाशांची आहे. 

नस्तनपूरकडे दुर्लक्ष 

देशातील भाविकांचे महत्त्वाचे स्थान म्हणजे, श्रीक्षेत्र नस्तनपूरचे शनी महाराजांचे देवस्थान. शिर्डीच्या धर्तीवर या तीर्थक्षेत्राचा विस्तार झाला आहे. मात्र मंदिरासमोरून असलेल्या लोहमार्गावरून धावणारी रेल्वे या ठिकाणी थांबत नाही. यात्रेच्या काळात पॅसेंजर रेल्वेगाड्यांचा तात्पुरता थांबा देण्यात येतो. मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी फलाटाची निर्मिती आणि महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा दिल्यास रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. 
नांदगावला प्रवासी गाड्यांच्या थांब्यासाठी आंदोलने करावी लागतात. हुतात्मा व विदर्भ एक्‍स्प्रेस या रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा या मागणीला रेल्वे अधिकारी जुमानत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांसोबत चाकरमाने, व्यापारी अन्‌ प्रवाशांना मनमाडला जावे लागते. शिवाय नांदगाव, लासलगाव, निफाड स्थानकात फलाटांची सुधारणा झाली. मात्र छताअभावी प्रवाशांना पाऊस, ऊन-वाऱ्यात उभे राहावे लागते. उद्‌घोषणा प्रणाली आणि बोगीदर्शक फलकांच्या घोषणा झाल्या असल्या, तरीही सोय नाही. सध्या लासलगाव-समीटदरम्यान "अंडरपास'चे काम सुरू आहे. तसे काम नांदगावच्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी सुरू होणार होते. तेही सुरू झाले नाही. 

लोकोशेड हलले अन्‌ भकासपण 

रेल्वेचे 16 लाइनचे मोठे यार्ड व मुबलक जागा प्रशासनाच्या ताब्यात असूनही केवळ पाणी मिळत नाही, एवढ्या मुद्द्यावर नांदगावकडे दुर्लक्ष करण्यात आले. म्हणजेच पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी रेल्वेला वेगळ्या जागेची शोधाशोध करण्याची गरज नाही. भुसावळ, इगतपुरीनंतर सर्वांत अधिक स्वमालकीची जागा केवळ नांदगावला रेल्वेच्या ताब्यात आहे. 1980 पासून पाणीटंचाईमुळे रेल्वे प्रशासनाने लोकोशेडसारखे जुने प्रकल्प इथून हलविले व तेव्हापासून रेल्वेच्या या स्थानकाला आलेले भकासपण अद्यापही कायम आहे. 

रेल्वेला कुशल मनुष्यबळाची लागणारी आवश्‍यकता लक्षात घेता, विद्यापीठस्तरावरच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासाठीचे अभ्यासक्रम सुरू करण्याला रेल्वेने प्राधान्य दिले आहे. त्यासाठीचे केंद्र नांदगाव, मनमाड यांपैकी एका ठिकाणी सुरू करता येऊ शकते. 
-नितीन पांडे, मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com